पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२
बाल कवि ठोंबरे

 उपाध्यक्ष - रावसाहेब विष्णु मोरेश्वर महाजनी, डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शनस, व-हाड प्रान्त.
 मंत्री - नारायण वामन टिळक.
 उपमंत्री - रा. नारायण नरसिंह फडणीस.
 सभासद - रा. मोरो गणेश लोंढे, रा. चंद्रशेखर गोव्हे, रा. काशीनाथ हरी मोडक (माधवानुज ) रा.नारायण सिद्धेश्वर जोशी.
 ह्या संमेलनाचे काम येथेंच आटोपले. परंतु ह्या संमेलनाने महाराष्ट्र सारस्वतासाठी दोन फार मोठाल्या गोष्टी केल्या. एक बालकवि ठोंबरे ह्यांना उदयाला आणले. व दुसरें अभिनव काव्यमालेची कल्पना येथूनच जन्माला आली. पुढे पुण्यास टिळक गेले व तेथे प. वा. लक्ष्मण शास्त्री लेले, प. वा. रावसाहेब कानीटकर, प. वा. वासुदेवराव आपटे, रा. न. चिं. केळकर वगैरे मंडळींच्या सहकार्याने अभिनव काव्यमाला सुरू करण्यांत आली.
 ठोबऱ्यांबद्दल टिळकांना चैन पडेना. हा मुलगा कोठे तरी शाळेत गेला पाहिजे व ह्याचे काही शिक्षण झाले पाहिजे. ह्याच्या काव्यशक्तीला ओहोटी लागेल असें कांहीं होता कामा नये. म्हणून त्यांनी कर्नल कीर्तीकरांशी जोराचा पत्रव्यवहार सुरू केला. कर्नल कीर्तीकर श्रीमंत होते व टिळकांचे मित्रहि होते. त्यांनी ठोंबऱ्यांना दरमहा दहा रुपये दण्याचे कबूल केले. मात्र एक अट घातली, की ठोंबऱ्यांनी नगरास येऊन टिळकांच्या देखरेखी खाली रहावे. त्याप्रमाणे झाले व ठोंबरे नगरास आले.
 ठोंबरे एकटेच आले. आदल्याच दिवशी नेहमीच्या रिवाजाप्रमाणे टिळक बाहेरगांवी गेले होते. मी वर सांगितल्याप्रमाणे आजारी होते. जातांना टिळकांनी मला सांगुन ठेवले होते, की बालकवि येणार आहेत त्यांची नीट व्यवस्था ठेवा.
 नाताळचा दिवस होता. दहाचा सुमार, मी निजलेली, मुलें देवळाला (चर्चला ) गेलेली, घरांत कोणाचा पत्ता नाही, चाकर नोकर, शेजारी पाजारी झाडून सारे देवळाला गेले होते, इतक्यांत ठोंबरे आले. मी विचारले 'तुम्हीच का ठोंबरे?'