पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५ : बालकवि ठोंबरे

 टिळकांचे एक कविमित्र होते. त्यांचे नांव कर्नल कीर्तिकर. जळगांवच्या कविसंमेलनाचे तेच अध्यक्ष होते. हे डॉक्टर असून पुष्कळशा लढायांवर जाऊन आलेले होते. कर्नल कीर्तिकर माझ्याबद्दल 'एव्हर डाइंग वाईफ ऑफ युअर्स' असा टिळकांच्या पत्रांत नेहमी उल्लेख करायाचे. कारण मला कांहींना काही तरी नेहमी होत असे व नेहमी मी अंथरूण धरलेले असे. अंथरूण म्हणण्यापेक्षां जमीन म्हटली तर अधिक शोभेल. कारण माझी लोळणफुगडी जमीनीवरच चाले. मात्र भूमि शय्या असली तरी नुसता भुजच तेवढा केवळ उशाला पुरत नसे. उशाला मी काय घेईन ह्याचा कधी नियम नसे. आठवा, जात्याचा खुंटा, तपकिरीची डबी-थोडक्यांत म्हणजे जे काही हाताला लागेल ते माझ्या उशाखाली जायचे. असो.
 १५ मार्च १९०७ च्या ख्रिस्ती नागरिकांत टिळकांनी ह्या २६ कवींच्या कवि-संमेलनाविषयीं एक मोठा बातमीपत्रवजा लेख लिहिला आहे. त्यांत तें ठोंबऱ्यांविषयी लिहितात, की
 "त्यांतच कुमार त्र्यंबक बापुजी ठोंबरे नांवाच्या केवळ तेरा वर्षांच्या बाल-कवीचें शीघ्र कवित्व जमलेल्या मंडळीस पहावयास मिळाले. ह्याची शुद्ध, सुगम, रसाळ कविता ऐकून कवित्वशक्ति ही ईश्वरी देणगी आहे असें कोणला वाटले नसेल ? हिंदुस्थानांत असे किती बालकवि, किती बालसाधु, किती बालवीर उत्पन्न होत असतील आणि पुढे फुकट जात असतील! ह्याचा शोध करून ह्यांना प्रगल्भदशेला आणण्याचे काम कोणी करावयाचें ? आम्हींच हिंदपुत्रांनी ना? असो; ईश्वर ह्या मुलाकडून आमच्या देशाची पूर्णपणे सेवा करून घेवो! आम्ही तर सध्या तोंडपाटिलकी आणि कलमबहादुरी करण्यांत गुंतलों आहो!"
 शेवटी "आधुनिक मराठी कवींची व कवितेची काहीतरी पद्धतवार सेवा घडावी" म्हणून खाली दिलेले कार्यकारी मंडळ नेमण्यांत आले.
 अध्यक्ष-लेफ्टनंट कान्होबा रणछोडदास कीर्तीकर, आय्. एम्. एस्. पेन्शनर.