पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३
हिच्या गळ्यांत मंगळसूत्र कसें नाहीं?

चांगले आहेत ते." "हे पहा त्यांचे पत्र. मी घरी आलों तो हे हाती आले. ते म्हणतात हेच तुला माझें शेवटचे पत्र. ह्यापुढे तुला माझें तोंड दृष्टीस पडणार नाही.
आतां माझ्या ध्यानात सर्व प्रकार आला. मी त्यांना सर्व काही सांगितले. भाऊजींचा जीव खाली पडला व ते घरी गेले.

 राहूरीस असतांना आमच्याकडे एक कवि आले होते. त्यांनी नुकताच पोलीसच्या नोकरीस रामराम ठोकला होता. पुढे काय करायचे हे त्यांचे ठरले नव्हते. पण त्यांनी खूप कविता रचल्या होत्या. व आणखी खूप रच- ण्याचा त्यांचा मानस होता. त्यांच्या कवितांतील एका कवितेचा आरंभ 'नको ही पोलिसची चाकरी' असा होत होता. पोलिस खात्यांतील आपले गमती गमतीचे अनुभवहि ते पुष्कळ सांगत. आतां नाटके रचून पुढचा काळ घालवावा असें त्यांच्या मनांत आले व त्यांनी ताबडतोब नाटक लिहिण्यास घेतले. त्यांचा कारकून दत्तू. त्यांनी सांगावे व ह्याने भराभर उतरून घ्यावे. ते कविता तर जणू काही पाठ म्हणून दाखविल्या- प्रमाणे बोलता बोलतां करीत. नाटक प्राचीन हिंदुस्थानांतील कांहीं ऐति- हासिक कथानकावर होते. त्यांत “कोणि कोणि चंदनाचि उटणिं लाविती" असें एक गाणे होते. हे नाटक एखादा अंक लिहून झाल्यावर संपलें ! कवि- राज आपल्याबरोबर एक बायकोहि घेऊन आले होते ! अर्थात् ब्राह्मणाची बायको आमच्या घरांत कशी राहील? ती राही शेजारच्या बिरोबाच्या देवळांत-तिकडेच स्वैपाक करी. फारशी आमच्यासमोर येतच नसे. मी म्हणे कविराज ही ब्राम्हणाची बायको आणि हिच्या गळ्यांत मंगळसूत्र कसे नाही? ते म्हणत अहो बाई हिला लहानपणापासून मराठ्यांचा सह- वास म्हणून नसेल घालींत.
 बायकोला आपला जाच आहे व आपण तिला खूप छळतों असें दाख- विण्यासाठी त्यांनी आंत जाऊन तिला मारण्याचें नाटक करावें. तिनें खोटेंच रडावें. पण रडता रडतां मधूनच दोघांचाहि हंसण्याचा आवाज एखादे वेळी येई. तेव्हां मी ओळखले होते की हे सारें नाटक आहे म्हणून. पण तशी ओळख मात्र कधी दिली नाही.