पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२
पुनर्जन्म

 बालेंटाईनसाहेबांची कल्पना झाली, की मी काही तरी पक्कान्न करून खाल्ले. नुकतेच एक दोनदा त्यांना मी पुरणाच्या पोळ्या व लाडू पाठविले होते. त्यांचे तेव्हांपासून असे मत झाले होते, की मी रोज रोज पक्वाने खातें व दुसऱ्यांना खायला घालतें.
 असो; पण हे साहेब भडकले होते तरी फार सहृदय होते. त्यांनी ताबड- तोब आम्हाला औषधे दिली व नुसत्या मोसंब्यावर आम्हांला ठेवले. मग आम्हाला आराम पडला. हा प्रकार शुक्रवारी झाला. मी रविवारी चर्चला येते तो माझ्यांत इतका फरक पडलेला दिसून आला, की मला कोणी ओळखलें सुद्धा नाही.
 जे ते मला विचारूं लागले, की बाई तुम्ही काय उपाय केला सांगा. पण मी कधी कोणाला माझा उपाय सांगितला नाही व ती बर्फीसुद्धा कोणाच्या हाती लागू दिली नाही. चिमबाबाने अगदी विश्वासाने ती खोल पुरून टाकली.
 टिळक जालन्याहून आल्यानंतर माझा शारीरिक फरक पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. मात्र अघोरी म्हणून त्यांनी शेरा मारला.
 आम्ही राहुरीस आलो तसे सखाराम भावोजीहि राहूरीस येऊन तेथें वकिली करूं लागले होते. टिळक जालन्याला जातांना त्यांच्या घरी भेटा- यला गेले होते. त्यांच्या भावजयीने त्यांना तवा, कढई वगैरे जिनसा आणण्यास सांगितल्या होत्या. टिळकांनी त्या अगदी न विसरतां आणल्या व स्वतः त्यांच्या घरी त्या नेऊन दिल्या. त्यावेळी रखमाईने टिळकांना त्या जिनसांची किंमत विचारली. टिळकांना आपल्या भावजयीचा त्यामुळे फार राग आला व दोघांचे काही भांडण झाले. नंतर टिळक घरी आले व तें भांडण विसरून गेले.
 रात्री जेवणीं खाणीं संपून टिळक जाऊन निजले; इतक्यांत दाराशीं एक तांगा येऊन उभा राहिला. आंतून भाऊजी उतरले ते अगदी घामाघूम झाले होते. त्यांच्या तोंडावर सहा महिन्याच्या दुखणेकऱ्याची कळा आली होती. त्यांना पाहून मी घावरून गेले. मी म्हटले, “ भाऊजी, काय झाले? घरी सगळी बरी आहेत ना ?"
 "हो! पण नाना कसा आहे ?" “म्हणजे ? ते जेऊन आतांच निजले,