पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ऑ प रे श न ची त या री

 "आच्छा, अब तो नहीं. लेकीन खाना खाये बाद उनसे कहे देउंगी." डॉक्टरांची ही नवीन बहीण त्या दिवशी पाठच्या बहिणीहून अधिक जवळची झाली. त्यांचा पाहुणचार करण्याचा सर्व मक्ता त्या दिवशी तिनेच घेतला होता.
 दुपारच्या जेवणाच्या वेळी सर्व एका पंक्तीला बसले. मी व गोपाजी मात्र समोर बसलो होतो. वाढण्याचे काम व्हर्जिनियाबाईकडे होते. जेवतांना कोणीच कोणाशी बोलत नव्हते. टिळक विचारांत व डॉक्टरांनी मौन व्रत घेतलेलें; त्यांना काही लागले म्हणजे त्यांनी 'दत्त' म्हणावे व ताटांत तो पदार्थ वाढलेला असेल तेथे बोट आपटावें. मी गोपाला हळूच डाव्या हाताने डवचून डॉक्टरकडे पाहण्यास सांगे. डॉक्टर त्याच्याकडे मोठ्या चमत्कारिक नजरेने पहात. तसा तो मला म्हणे,
 "लई गि-हेबाज पाखरू ! लोटण कबूतर ! कुठं गवसलं कुणास ठाऊक. बाई माझ्या तावडीत येऊ द्या त्याला. अशी गोफण मारीन, की ज्याला म्हणतात तशी."
 टिळक म्हणत. काय रे वेड्यासारखी बडबड लावली आहेस गोपा! वेड तर नाही लागले तुला ? नीट मुकाट्याने जेव."
 गोपा डॉक्टरांना इतके बोलत होता तरी आपल्याला त्यांतले कांहीं कळते आहे असें डॉक्टरांच्या चेहऱ्यावर मुळीच दिसत नव्हते. जेवण झाल्यावर टिळक आपल्या खोलीत गेले व बाकी आम्ही सर्वजण दंगल करायला मोकळे झालो. मी पुन्हां गोपाच्या डोळ्याचा प्रश्न काढला. "पैसे काही मिळणार नाहीत. तो आहे गरीब." मी वकीलीला सुरवात केली. व्हर्जिनियाबाई व डॉक्टर ह्यांचे अबकडच्या भाषेत थोडावेळ -बोलणे झालें व बहिणीने उर्दूत आम्हाला सांगितले, की माझा भाऊ हे काम फुकट करायला तयार आहे.
 झालें ! ऑपरेशनची तयारी झाली ! नर्सबाईंनी घरांतून सामान आणले. मेजाऐवजी तीन पाट आणून व्यवस्थेने मांडले, पाण्याची घागर, परात, घंगाळ, दोन रुमाल, एक नवी दोन वीत लांबीची चकाकणारी सुरी, एक चमचा!-चमचा पाहून मी विचारले, “काय ग हा चमचा कशाला?"