पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गो पा जी

पाठीवर काहींसेंसें होतें. मी चालण्यावरून त्याला ओळखलें. तो तर आमचा गोपा! टिळकांनी ह्याला बराच रंगारूपाला आणला होता. आतां जवळच्याच खेड्यांत तो एक मास्तर होता व गोपाचा गोपाळराव झाला होता. आम्हाला तो आमच्या घरच्यासारखाच वाटे. त्याचे डोळे जरा अधू होते. तो जसजसा जवळ येऊ लागला तसतसा माझा नेहमींचा स्वभाव उसळी मारू लागला. मला पाहून तो झपाझप पावले टाकू लागला. शेवटी जवळ येऊन त्याने आपल्या पाठीवरील गाठोडे खाली ठेवले व पाहुण्याकडे हात करून हे कोण म्हणून खुणेने विचारले. पण त्याच्या खुणेच्या प्रश्नाला मी सरळ मराठीत मोठ्याने उत्तर दिले.
 "काय करूं रे गोपा! मला अगदी कंटाळा आला आहे ! तूंच पाहतोस ना किती हे पाहुणे ! हा एक असाच आला आहे. ह्याला आमची भाषा समजेना नि आम्हाला ह्याची समजेना. आहे एक खायला काळ नि भुइला भार. धड वेडा ना धड शहाणा !"
 मी गोपाशी हें हितगुज करीत आहे तो डॉ. गोवंड्यांनी करमरकरांकडे किलकिले डोळे करून पाहिले. करमरकरांनी त्यांच्याकडे डोळे मिचकावले. माझं बोलणे इतके मोठ्याने होते, की आंतून व्हर्जिनियाबाईंनी ते ऐकलें व बाहेर येऊन माझ्यापुढे हातवारे करीत तो बोलू लागली “आप ये क्या कहते हो ? आप इनको पहच्छानते नही ? ए जनाब मेरे भाइजान हैं. और तंजावरके आगे दिल्लीनगरके रहनेवाले है. वहां इनका बहोत बडा दवाखाना है.” इतके बोलून ती पुन्हा स्वैपाकघरांत गेली.
 इकडे डॉ. गोवंडे आपल्या पथारीवर उठून बसले होते. मांडी घालून अगदी निर्विकार मुद्रेने ते आम्हा दोघांकडे पहात होते. व्हर्जिनियाबाईंनी पुन्हां बाहेर येऊन आपल्या भावाबद्दल आणखी माहिती सांगितली.
 "हमारा भाई बोहत आसानी से आंखोंको आपरेशन करते है. इनकी तरकीब ऐसी उमदी है के दोनो आखाको निकालकर मेझपर रख देते है. फिर उनकी व्हो उनको खाक वो मिट्टी निकालकर अच्छी त-हेसे धोकर चष्मखानेमें बिठा देते है. मेरी शादी होने के पहिल मै इन्हींके दवाखानेमें नर्स थी."
 "मला काय ग हे ठाऊक ? मग माझ्या गोपाचे डोळे घे ना तपासून !"