पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२: गो पा जी

 (टिळकांच्या मेंदूभोवती एकदां विचारांचे कुंपण पडले, की त्यांना बाहेरच्या वातावरणाची दाद नसे. ते विद्वान, मी विनोदी. पण त्यांची विद्वत्ता माझ्या विनोदाच्या आड येत नसे व माझा विनोद त्यांना त्रास देत नसे.)
 माझी मुलगी हौशी बाळंतपणाला आली होती. सुगंधराव करमरकर सहकुटुंब आमच्याचकडे होते. त्यांचे कुटुंब व्हर्जिनियाबाई ह्या उत्तर हिंदुस्थानी होत्या. त्यांना मराठी कळे पण त्या बोलत हिंदुस्थानी. आम्ही रानांत होतो तरी आमच्या घरच्या चार माणसांबरोबर आठ दहा पाहुणे सहज असत. ज्वरबिंदूचे डॉ. भास्करराव गोवंडे त्या दिवशी पाहुणे आले होते. डॉ. गोवंडे दिसण्यांत धिप्पाड, गोरे, घाऱ्या डोळ्यांचे व भरपूर दाढीमिशा असलेले रुबाबदार गृहस्थ होते. सुगंधरावांची बायको त्यांची बहीण म्हणून संपादून जाण्यासारखी होती.
 सकाळी आठ नवाचा सुमार होता. चहा व इतर जिन्नस ह्यांचा भरपूर समाचार घेऊन आम्ही आपापल्या कामाला लागलो होतो. म्हणजे टिळक लिहायला, हौशी व व्हर्जिनियाबाई स्वैपाकाला, डॉ. गोवंडे व सुगंधराव करमरकर बाहेरच्या ओसरीवर पडल्या पडल्या गप्पा मारायला व मी जाळीला टेकून टेहळणी करायला. आमच्या घराच्या ओसरीला लोखंडी पट्ट्यांची जाळी असे. तिला टेकून बसलें, की घरांत काय चालले आहे तें एकाच वेळी सर्व दिसे.
 मला उपचाराची बाघा बहुत करून कधीच होत नाही. माझे पाहुणे मला घरचेच वाटत. व मी कधी कोणाच्या घरी गेलें, की क्षणामध्ये घरची बनते. (बालकवि ठोमरे मला नेहमी म्हणायचा लक्ष्मीबाई तुमच्याकडे पंचम जॉर्ज आले तर त्यांना तुम्ही सांगाल, की बाबा रे येतांना तेवढे फाटक लोटून घे." मी बसले होते तेथे जवळच डॉ. गोवंडे व करमरकर लोळत होते. त्यांचे डोळे बंद होते पण कान उघडे होते. इतक्यांत मला सडकेवरून एक माणूस लगबगीने येतांना दिसला. त्याच्या