पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खानला आतल्या खोलीत नेलं, तेव्हा बाहेर आमच्याबरोबर ते हुजत घालत होते. खान असं काही करत असेल, हे मानायलाच ते तयार नव्हते. पण तेवढ्यात तिथं आणखी एक बाई आली. आम्हाला तिथलेच कर्मचारी समजून ती म्हणाली, “मुलगा की मुलगी बघायचंय... तेव्हा कुठं पोलिस अधिकाऱ्यांना खात्री पटली. अर्थात, खान दोन-तीन गुन्ह्यांसाठी पोलिसांना हवा होता. सोनोग्राफी मशीन शोधताना त्याची बँकेची पासबुकं, प्रॉपर्टीचे कागदपत्र, गाड्या असं बरंच काही पोलिसांना सापडलं. सोनोग्राफीसाठी आलेल्या बाईला विचारलं, "तुला हे ठिकाण कुणाकडून समजलं? तिनं दिलेल्या उत्तरानं सगळेच चाट पडले. तिला क-हाडच्या एका प्रतिष्ठित कॉलेजच्या प्राध्यापिकेनं काशीळला जायला सुचवलं होतं. कपाळावर हातच मारून घेतला मी!

 इकडे बोरगाव पोलिस खानची चौकशी करत असताना मी पुन्हा साताऱ्यात आले. शाहपुरी पोलिसांची तयारी झाली होती. त्यांना घेऊन वैद्यकिय अधिकाऱ्यांनासह शाहपुरीतल्या डॉक्टरांच्या क्लिनिकवर छापा टाकला. आम्ही दिलेल्या वीस हजार रुपयातल्या काही नोटा जप्त झाल्या. बाकीच्या नोटा बोरगावला आल्या होत्या. साताऱ्यातून डॉक्टरांना ताब्यात घेऊन आम्ही काशीळला आणलं. तिथं खानच्या घरासमोर आता गर्दी झाली होती. पत्रकारही जमले होते. दोघांनाही बोरगाव पोलिसांनी ताब्यात घेतलं. कलमं कोणती लावायची, आयपीसीची कुठली, पीसीपीएनडीटी कायद्याची कुठली, यावर चर्चा झाली. बोरगाव पोलिस ठाण्यात खानविरुद्ध गुन्हा दाखल करून आम्ही माघारी फिरलो तेव्हा खूप रात्र झाली होती.

 सोनोग्राफी करणारे गजाआड झाले होते. आता गर्भपात करणाऱ्याकडे मोर्चा वळवायचा होता. थांबून चालणार नव्हतं. सातारा आणि काशीळमधली कारवाई होईपर्यंत मी अकलूजच्या हॉस्पिटलमध्ये झालेल्या गर्भपाताबद्दल सोलापूर जिल्हा प्रशासनाला कळवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही साताऱ्याहून निघालो. सोलापूरच्या सिव्हिल सर्जनना घेऊन आम्ही अकलूजमध्ये पोहोचलो, तेव्हा दुपारचे चार वाजले होते. रामसिंगला बरोबर घेतलं होतं. फाइव्ह स्टार हॉटेलला लाजवेल असं हॉस्पिटल, यापूर्वीही अशा घटनांमुळं चर्चेत आलं होतं. डॉक्टर स्वतः शिक्षा भोगून आले होते.

८०