पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तपशील लिहून अॅफिडेव्हिट तयार केलं. डॉक्टरांचं क्लिनिक माझ्या बहिणीच्या, रूपाताईच्या घराजवळच आहे. रूपाताई आणि शैलाताई घराजवळच रिक्षा घेऊन तयारीत राहिल्या. कार्यकर्ता सुषमाला घेऊन क्लिनिकमध्ये गेला. मी आणि कैलास थोड्या अंतरावर गाडी घेऊन थांबलो. आमची गाडी डॉक्टरांनी ओळखली असती म्हणून! कार्यकर्त्याचा एक मित्र मोटारसायकल घेऊन तयार होता. ठरल्याप्रमाणं कार्यकर्त्यानं डॉक्टरांशी संभाषण झाल्यावर शैलाताईंना मेसेज केला. शैलाताईंनी मला फोन केला... "डॉक्टर त्यांना घेऊन बाहेर पडतायत.मम तेवढ्यात डॉक्टरांची काळ्या रंगाची गाडी सुसाट वेगानं बाहेर पडली. शैलाताईंनी रिक्षा वळवून घेईपर्यंत दिसेनाशीही झाली. मग कार्यकत्यांच्या मित्राबरोबर शैलाताई मोटारसायकलवर बसल्या आणि पाठलाग सुरू झाला. आम्हीही निघालो. कैलास वेळीप्रसंगी खूप वेगानं गाडी चालवू शकतो. तरीसुद्धा आम्हाला काळी गाडी दिसत नव्हती, इतक्या वेगात ती गेली होती. गाडीतूनच आम्ही शाहूपुरी पोलिस ठाण्यात फोन केला आणि तयारीत राहायला सांगितलं. काशीळमधला डॉ. खानचा दवाखाना बोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्यामुळं बोरगाव ठाण्यालाही कळवलं. तिथून पोलिसांची गाडीही निघाली. डॉक्टरांची गाडी खूप पुढे गेली असली तरी काशीळला खानकडेच जाणार, हे आम्हाला माहीत असल्यामुळं त्या दिशेनं सगळ्या गाड्या सुसाट निघाल्या. पोलिस येईपर्यंत आम्हाला ओळखसुद्धा द्यायची नाही, अशा सूचना कार्यकर्त्याला आम्ही दिल्या होत्या. खानच्या घरासमोर काळी गाडी दिसली. बोरगाव पोलिसांची गाडी आल्यावर मी गाडीतून उतरले. पोलिसांनी गाडीतून उड्या टाकल्या.

 खानला समोर बघितल्यावर माझी मस्तकाची शीरच तडतडली. वैद्यकिय अधिकारी यांनी त्याला ताब्यात घेऊन आतल्या खोलीत नेलं. सोनोग्राफी मशीन ताब्यात घेणं आवश्यक होतं. पण आम्ही आत येईपर्यंत चमत्कार झाला होता. मशीन गायब झालं होतं. शैलाताईंनी आणि वैद्यकिय अधिकारी बोरगाव पोलिसांनी सगळीकडे शोधाशोध केली. पाण्याच्या टाकीत, घरामागच्या विहिरीत, सगळीकडे शोधलं; पण मशीन सापडलंच नाही. बोरगाव पोलिस ठाण्याचे प्रमुख साध्या वेशातच आले होते. पण आम्ही खानला निष्कारण गोवत आहोत, असंच त्यांना वाटत होतं. पोलिसांनी

७९