पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हॉस्पिटलचा थाट काही औरच. प्रशस्त इमारत, देखणं इन्टीरिअर. मुख्य म्हणजे, रेकॉर्ड अपडेट ठेवलेलं. सिव्हिल सर्जन आणि आम्ही डॉक्टरांना काही प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर रेकॉर्डही बघू लागलो. गर्भपातांच्या नोंदी तपासताना त्यात रामसिंगच्या बायकोचं नाव दिसलं. त्याचबरोबर या सोनोग्राफी मशीनची नोंदणी एमटीपी कायद्यांतर्गत केलेली नव्हती, हेही स्पष्ट झालं. पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत केवळ डॉटरच नव्हे तर त्यांच्या वडिलांनाही शिक्षा झाली होती. मग डॉटरांनी आपल्या पत्नीला गायनॅकॉलॉजीचा कोर्स करायला सांगितलं. विजापूरमधून पत्नीनं तो कोर्स केला आणि मग तिच्या नावावर सोनोग्राफी मशीनचा परवाना मिळवला.

 ही सगळी माहिती घेता-घेता बरंच रेकॉर्ड तपासून झालं होतं. पंढरपूर, माळशिरस, फोंडशिरस, नातेपुते, म्हसवड, फलटण, वाई... अगदी दूरदूरच्या महिलांचा गर्भपात या हॉस्पिटलमध्ये झाल्याच्या नोंदी होत्या. यातले बहुतांश गर्भपात संशयास्पद असणार, याची आम्हाला खात्री पटली. रेकॉर्डनुसार या सगळ्या गर्भपातांची चौकशी व्हायला हवी, असं आम्ही पोलिस अधिकाऱ्यांना सांगितलं. अकलूजचे पोलिस उपअधीक्षक हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी पंचनामे, मशीन सील करणं, जाबजबाब ही सगळी कायदेशीर प्रक्रिया उरकून आम्ही परत निघालो, तेव्हा रात्रीचे तीन वाजले होते. दमणूक तर खूप झाली होती; पण डोक्यातली चक्रं थांबत नव्हती. कुठे वाई तालुक्यातलं छोटंसं गाव, कुठे सातारची शाहपुरी, कुठे काशीळ, कुठे शिरवळ.... आणि कुठे अकलूज! एका मुलीला जन्म नाकारण्यासाठी कुठल्या कुठे भटकंती करतात माणसं! कुठल्या कुठल्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कुठले-कुठले गुन्हे नोंदवायचे? कोणकोणत्या कोर्टात कुणा-कुणाविरुद्ध खटले लढवायचे? केवढी ही साखळी! कशासाठी..? मुलगी नको म्हणून! मुलगा हवा म्हणून देवाला नवस बोलणारी ही माणसं मुलगी नको म्हणून इतक्या ठिकाणी फिरून, इतकी पापं करताना त्याच देवाला घाबरत कशी नाहीत? एक प्रकरण खणून काढलं, तर इतकी दमणूक होते आपली... पण थकायची परवानगीच नाही आपल्याला....शक्य तेवढ्या साखळ्या उद्ध्वस्त केल्याच पाहिजेत... शक्य तितक्या मुली वाचवल्याच पाहिजेत!

८१