असंतो सांगत होता. पण 'गर्भ सापडला नाही, तर तुझी खैर नाही, असा उलटा दम मी म्हाताऱ्यालाच दिला तेव्हा तो गप्प झाला. सूर्योदय झाल्याबरोबर तहसीलदार पंचांना घेऊन डोहाजवळ गेले. गर्भ सापडला. सहा महिन्यांची मुलगी. नदीपात्रात, थंड वातावरणात राहिल्यामुळं जशीच्या तशी राहिली होती. डॉक्टरनं गर्भ नेण्यासाठी दिलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत स्पष्टपणे दिसत होता तिचा पूर्ण आकार धारण केलेला देह. आईच्या ऊबदार गर्भातून खेचून नीरेच्या थंडगार डोहात गाडला गेलेला. श्वास घेण्याचा हक्क नाकारलेला इवला मानवी देह! त्या वितभर देहाकडे बघून तळपायाची आग मस्तकाला गेली.
गर्भ डीएनए चाचणीसाठी पाठवून रामसिंगला दमात घेतलं. फौजी असूनही त्याच्याबद्दल कोणतीही सकारात्मक भावना मनात शिल्लक नव्हती. त्याला म्हटलं, “ज्या डॉक्टरांनी सोनोग्राफीसाठी तुझ्या बायकोला खानकडे पाठवलं, त्याची अपॉइन्टमेन्ट आता तूच आम्हाला मिळवून द्यायची, समजलं? शाहूपुरीतल्या त्या डॉक्टरांचे कारनामे आम्हाला आधीपासूनच ठाऊक होते. अशा एका प्रकरणात पूर्वी ते निर्दोष सुटले होते. त्याला जाळ्यात पकडण्यासाठी आम्ही गर्भवती महिलेचा शोध घेऊ लागलो. डॉ. आ. ह. साळुखे यांची सून उमा साळुखे या एकात्मिक बालविकास यंत्रणेत सुपरवायझर असल्यामुळं त्यांनाही सांगून ठेवलं होतं. त्यांनी सुषमाचं नाव सुचवलं. साताऱ्यातल्या एका खेड्यातील ही अंगणवाडी सेविका. तिसऱ्यांदा गरोदर असल्यामुळं बाळाच्या जन्मानंतर नियमाप्रमाणं तिची नोकरी जाणार, हे निश्चित होतं. पण चांगल्या कामासाठी शासनाला मदत केली, तर शासनानं तिला मदत करावी, यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं तिला सांगितलं. तिचा भाऊ शहीद जवान. त्याच्या नावाची कमानही आहे तिच्या गावात. तिच्या घरी जाऊन तिच्या सासू-सासऱ्यांना, पतीला विश्वासात घेतलं. तिनं तयारी दर्शवल्यावर आम्ही तिला साताऱ्याला आणलं. आमच्या एका कार्यकर्त्याला तिच्या नवऱ्याची भूमिका दिली. तो छुपा कॅमेराही सहजगत्या हाताळण्यात पटाईत होता.
रामसिंगनं शाहपुरीतल्या डॉक्टरांना फोन केला. "माझ्यासारखाच फौजी आहे. त्याला मदत करा, असं बोलला. डॉक्टर तयार झाले; पण रेट वाढलाय असं सांगितलं. वीस हजारांची मागणी केली. मग आम्ही नोटांचा