पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लांब. पण तिच्यासाठी गाडी काढून आयुष्यात पहिल्यांदाच मी पानपट्टीवर गेले. तंबाखूची गोळी लावताच रेखा कोर्टात घडाघडा बोलू लागली. तिची सरतपासणी तीन दिवस चालली. उलटतपासणीत तिला खूप छळलं. प्रत्येक आरोपीचा एकेक वकील. प्रत्येकजण वेगवेगळे प्रश्न विचारून सतावू लागला. पण रेखा बधली नाही. एक वकील तर बीएमडब्ल्यू कारमधून येणारा. आपल्यासोबत दहाबारा सहकारी वकिलांचा ताफा घेऊन फिरणारा.

 या खटल्यात कैलास पंच होता. पाच आरोपींच्या पाच वकिलांनी कैलासलाही खूप छळलं. पण इथं एक गंमत झाली. एका वकिलानं कैलास पंचनाम्याला उपस्थितच नव्हता, असा बचाव घेतला. कैलास माझा कार्यकर्ता आहे आणि साताऱ्याचं ऑफिस सोडून तो इस्लामपुरात येईलच कशाला, असा सूर त्यानं लावला होता. पंचनाम्याच्या ठिकाणी कैलासची उपस्थिती त्यानं नाकारली. मग दुसरा वकील उठला आणि कैलासला भलतेसलते प्रश्न विचारू लागला. इस्लामपूरला आला होतास, तर कुठल्या कुठल्या गाडीतून आलास? किती वेळ लागला? किती वाजता साताऱ्यातून निघालास? किती वाजता पोहोचलास? असे प्रश्न विचारले. पण कैलासनं त्याच्या प्रत्येक प्रश्नाला समर्पक उत्तरं दिल्यामुळं उलट पंचनामा शाबीत व्हायलाच मदत झाली. म्हणजे, एका वकिलानं नाकारलेला पंचनामा दुसऱ्या वकिलानं शाबीत करून दिला. पहिला वकील त्यामुळं खट्ट झाला. पीसीपीएनडीटी कायद्याचा अभ्यास असलेल्या निष्णात वकिलांना आम्ही या खटल्यात मदतीसाठी बोलावलं होतं. वकिलांचा मोठा ताफा असूनसुद्धा सर्व आरोपी दोन्ही न्यायालयांमध्ये दोषी ठरले. बत्तीस शिराळा कोर्टानं आरोपींना दोषी ठरवल्यावर शिक्षा सुनावताना सांगितलं, “इस्लामपूर आणि शिराळा न्यायालयानं ठोठावलेल्या शिक्षा आरोपींनी एकत्रितपणे भोगायच्या नाहीत. इस्लामपूर न्यायालयानं दिलेल्या शिक्षेचा कालावधी संपल्यानंतर शिराळा न्यायालयाच्या शिक्षेचा कालावधी सुरू होईल.

 आम्ही पुन्हा एकदा जिंकलो होतो. अपार मेहनतीला यश आलं होतं. केस हातातून सुटून जाता-जाता पुन्हा हातात आली होती. परंतु दरम्यानच्या काळात मी विपश्यनेसाठी गेले होते. तिथून आल्यावर आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की, कोर्टात यश येवो वा अपयश.... त्याचा विचारच

६४