बाईही बाहेर आल्या आणि त्यांनीही तेच सांगितलं. अर्ध काम झालं होतं. शैलाताईंनी तसा मेसेज मला केला.
या डॉक्टर लोकांचं सिंडिकेट आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला दादच द्यायला हवी. ताकारीच्या डॉक्टरांनी अशी मेख मारून ठेवली होती की, मुलगा असेल तरच त्यांना पैसे द्यायचे. मनासारखं नसेल, म्हणजे मुलगी असेल तर गर्भपात त्याच्याच दवाखान्यात म्हणजे ताकारीला करायचा. त्यामुळं प्रत्येक वेळी ते मुक्कामाच्या दृष्टीनं कपडेलत्ते घेऊन या, असं सुचवायचे. माझी मात्र अडचण झाली होती. सरकारी कॉटेज हॉस्पिटल इस्लामपूरला. त्यामुळं वैद्यकीय अधिकाऱ्याला नेऊन इस्लामपूर कोर्टात तक्रार दाखल करणं सोयीचं होतं. परंतु डॉक्टर ताकारीचे, तर सहकारी महिला डॉक्टर शिराळ्याच्या. काही झालंच तर न्यायालयीन कक्षा वेगवेगळ्या राहतील, अशी काळजी या मंडळींनी आधीच घेतली होती. त्यासाठी सोनोग्राफी एकीकडे आणि गर्भपात दुसरीकडे, अशी व्यवस्था केलेली. शिवाय, शिराळ्यात कारवाई करावी तर डॉक्टरीण बाईंचा नवराच जवळच्या ग्रामीण रुग्णालयाचा इनचार्ज! अखेर ताकारीच्या डॉक्टरांच्या ओम्नीतून शैलाताई आणि रेखानं निघावं आणि इस्लामपूरच्या हद्दीत आल्यावर ओम्नी अडवणार होतो.
ओम्नीचा पाठलाग करीत असतानाच मी ट्रॅप लावल्याचं सांगलीच्या पोलिस अधीक्षकांना कळवलं. जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यांनी ठराविक ठिकाणी पोलिस तैनात केले. शैलाताईंना मेसेज केला, 'तुम्ही इस्लामपूरच्या एसटी स्टँडपर्यंत या. आम्ही मध्येच कुठेतरी गाडी अडवतो. उलट्या सीटवर बसून आमची गाडी मागून येतेय की नाही, हे शैलाताई बघत येत असल्याचं सांगून शैलाताईंनी गाडी थांबवली. ओम्नी थांबताच रेखानंही छान अभिनय सुरू केला. आमची गाडी ओम्नीला ओलांडून पुढे जाईपर्यंत रस्त्याकडेला ती 'वॅक वॅक्म करत बसली. ओम्नीत बसल्यावर शैलाताईंनी त्यांच्या अस्सल कोल्हापुरी भाषेत डॉ. शिंदेंना सांगितलं की, घरून कपडे घेऊन रेखाचा नवरा आणि दीर टू व्हिलरवरून येतायत. रस्त्यात ते आपल्याला