पेशंटना घेऊन शैलाताई एसटी स्टँडजवळ यायच्या. कुणी पाठलाग केलाच, तरी मंडळी एसटीनं गेली असंच वाटायला हवं. थोड्या वेळानं आम्ही जिथं गाडी उभी केली असेल, त्या ठिकाणी या तिघी यायच्या आणि आम्ही साताऱ्याला यायचो. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच. कुणी बघणार नाही, अशा ठिकाणी तिघींना सोडायचं आणि तिथून त्यांनी हॉस्पिटलमध्ये जायचं. तीन दिवस असेच गेले आणि चौथ्या दिवशी सुनीता दवाखान्यात आलीच नाही. फक्त रेखाच शैलाताईंबरोबर आली. सोबत तिची पहिली मुलगीही होती. तिघींना डॉक्टरांनी ओम्नीमध्ये बसवलं. तेही खूप वेळ वाट बघायला लावून. शैलाताईंनी हेलपाटे घालायचे आणि डॉक्टरनं पेशंट तपासत राहायचं, हेच तीन दिवस चाललेलं. हा वेळकाढूपणा कशासाठी? जर ही मंडळी स्टिंग ऑपरेशनसाठी आलेली असतील, तर त्यांचे कॅमेरे, मोबाइल यातली बॅटरी संपेल, पुरावा मिळणार नाही म्हणून! केवढी ही हुशारी!!
ओम्नी गाडी आधी इस्लामपुरात आली आणि एका हाडाच्या डॉक्टरांच्या दवाखान्यासमोर थांबली, तेव्हा काय चाललंय कुणाला कळेनाच! प्रवासात शैलाताईंनी एक चांगली गोष्ट केली होती. ओम्नीमध्ये ड्रायव्हरच्या मागे असलेल्या उलट्या सीटवर बसल्या होत्या. म्हणजे, मागून आम्ही येत असताना त्यांनी काही खाणाखुणा केल्या, तर त्या ड्रायव्हरला आरशात दिसू शकणार नाहीत. शिवाय रेखाची मुलगी त्यांच्या मांडीवर होती. तिच्या आडून त्या मेसेज करत राहिल्या. आम्ही मागून हा प्रवास कॅमेऱ्यात शूट करत होतो... अर्थात कुणाला शंका येणार नाही, अशी काळजी घेऊन.
इस्लामपुरात काही वेळ थांबल्यानंतर गाडी बत्तीस शिराळ्याच्या रस्त्याला लागली. शिराळ्याच्या महिला डॉक्टरच्या दवाखान्यात सगळ्यांना नेण्यात आलं. डॉक्टरीण बाईचा नवरा कोकरूड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी. बाईंचा दवाखाना तळमजल्यावर आणि वरच्या मजल्यावर घर. ताकारीचे डॉक्टर आत गेले. डॉक्टरीण बाईंशी काहीतरी बोलला आणि पाच मिनिटांनी बाहेर आला. मग रेखाला आत नेलं. डॉक्टरीण बाईंनी सोनोग्राफी ली. एक्झामिनेशन रूम मोठी होती. पडद्याआड एक बेड आणि सोनोग्राफी मशीन. सोनोग्राफीनंतर दोघी बाहेर आल्या. थोड्या वेळानं ताकारीचे डॉक्टरही बाहेर आले. त्यांनी सांगितलं 'मनासारखं नाही.म मग डाकक्टरीण