पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/६५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भेटतील. ती नवऱ्याबरोबर मुंबईला राहते आणि तिचं गाव कोल्हापूर जिल्ह्यात आहे, असंही सांगितलं. गावाचं नाव राणीच्या लक्षात नाही, हे सांगताना शैलाताईंच्या अभिनयाचा कस लागला. पण डॉक्टर मंडळी आणि आमचे कार्यकर्ते यांच्यात जणू अभिनयाची स्पर्धाच लागली होती.

 इस्लामपूरजवळच्या पुलापाशी ओम्नी आल्याचा मेसेज आला आणि ठरलेल्या ठिकाणी, तिकाटण्यावर कैलासनं आमची गाडी ओम्नीला आडवी घातली. मी झटकन खाली उतरून आधी ओम्नीची चावी काढून घेतली. काहीतरी घडतंय, हे समजल्यावर प्रचंड गर्दी तिथं जमली. गाडीवाल्यांमध्ये साइड न देण्यावरून किंवा झासा मारण्यावरून भांडणं झाली असावीत, असा लोकांचा कयास होता. “ही मंडळी गरोदर बाईच्या पोटात मुलगा आहे की मुलगी, हे पाहून पाडायला निघाली होती,मम असं कैलासनं गर्दीला सांगितलं तेव्हा माणसं चिडली. मीही शैलाताईंना खोटं-खोटं झापू लागले. आता डॉक्टरांवर पब्लिक खवळलं आणि त्यांच्या अंगावर धावून गेलं. तेवढ्यात पोलिस आले आणि डॉक्टरांसह शैलाताई आणि रेखाला तिच्या मुलीसह पोलिसांच्या गाडीत बसवलं. तिथून दोन्ही गाड्या थेट पोलिस ठाण्यात गेल्या. तिथून उपजिल्हा रुग्णालयात. वैद्यकीय अधिकाऱ्यानं पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

 इथे अभिनयाचा दुसरा टप्पा सुरू झाला. आमच्या नाटकात पोलिसही सहभागी झाले. 'ताकारीच्या डॉक्टरीण बाई, शिराळ्याच्या डॉक्टरीण बाई, इस्लामपूरचा कम्पाउंडर, त्याचा मित्र या सगळ्यांना बोलावून घ्या... मिटवून टाकू, असं सांगून डॉक्टरांनाच सगळ्यांना फोन करायला लावले आणि एकेक करून सगळे आरोपी स्वतःच पोलिस ठाण्यात हजर झाले. शिराळ्याच्या डॉक्टरीण बाई मात्र माहिती मिळताच फरार झाल्या... घर, दवाखाना तसाच उघडा ठेवून! ताकारीच्या डॉक्टरीण बाई, इस्लामपूरचा कंपाउंडर, त्याचा मित्र हजर झाले. आम्ही दिलेल्या नोटा समुचित प्राधीकाऱ्यांनी तपासल्या. कारवाईच्या आधी आम्ही करून घेतलेल्या अॅफिडेव्हिटप्रमाणेच त्या होत्या. हे अॅफिडेव्हिट आम्ही नेहमी नोटराइज करून घेतो. आम्ही विनाकारण तर कुणाला गोवत नाहीये ना, याची शहानिशा केली. सोनोग्राफी मशीनचे नंबर आणि नोंदणी प्रमाणपत्रं तपासली.

६१