पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/५५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आतापर्यंत तीन डॉक्टरांना कोठडीपर्यंत पोहोचवून आलेली. इस्लामपूर, करमाळा आणि जामखेडच्या डॉक्टरांना बेकायदा गर्भलिंग चिकित्सा केल्याच्या आरोपावरून अटक झाली होती, ती आयेशानं स्टिंग ऑपरेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळंच. पण...

 हास्यविनोदाचा मूड बदलून मी गंभीरपणे बोलू लागले... "आयेशा, आता जी लढाई करायचीय, ती सोपी नाही. परक्या भागात चाललो आहोत आपण. इथल्या लोकांना किमान आपण चूक करतोय, एवढं तरी माहीत असतं. तिथं मात्र यात काही वाईट आहे, हेच मुळात मान्य नाहीये कुणाला. शिवाय... माणूस वजनदार आहे. वरपर्यंत हात पोहोचलेला. भीती वाटत असेल तर सांग."

 आयेशानं काही न बोलता नकारार्थी मान हलवली. “जे व्हायचं ते होऊ दे. आम्ही आहे तयार," असं म्हणून प्रदीपनंही दुजोरा दिला. मग मी तिकडची परिस्थिती थोडक्यात समजावून सांगितली. कैलास, शैलजाही कान देऊन ऐकत होते. म्हटलं, “हे बघा, चर्चा उघडपणे होतात; पण यंत्रणा काही करत नाही, अशा ठिकाणी आपण सावध असायला हवं. या प्रकरणात हात घालणं खूप धोकादायक आहे, असं सगळ्यांचं म्हणणं पडलंय. तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवलं जाईल, वेळप्रसंगी मारून टाकतील, असेही इशारे मिळालेत. धोका पत्करायचा का? आत्ताच ठरवा."

 लग्नानंतर आयेशाचं नाव 'भावना' झालं होतं. तिचा निर्धार पक्का होता. प्रदीपही तिला साथ देत होता. पण आम्हाला ज्या डॉक्टरचा पर्दाफाश करायचा होता, तो परळीतलं बडं प्रस्थ म्हणून ओळखला जात असे. अंदाज घेतला तेव्हा धोका स्पष्टपणे जाणवला होता. काही दिवसांपूर्वी दिल्लीत खासदारांची भेट झाली होती, तेव्हाही विषय काढला होता. मी काही करू शकत नाही,' एवढंच ते मोघम बोलले होते. ते आपल्यासाठी काही करू शकत नाहीत की या प्रकरणात पडू इच्छित नाहीत. याचा अंदाज या वाक्यावरून लावणं अवघड आहे. हे कार्यकत्यांना सांगितलं. पण मग कैलासनं मुंबई हायकोर्टाच्या बार रूममध्ये झालेल्या चर्चेची आठवण करून दिली. आमच्या आतापर्यंतच्या कारवाया अगदीच किरकोळ प्रकार चालतात, अशा ठिकाणच्या असून, राजरोस आणि मोठ्या प्रमाणावर जिथं गर्भलिंग चिकित्सा चालते, त्या परळीकडे आम्ही दुर्लक्ष केलंय, असं ज्येष्ठ वकील मंडळींनी निदर्शनाला आणून दिलं होतं. ही मंडळी

५१