Jump to content

पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सोळा की एकोणीस?

 हसतखेळत जेवण चाललेलं. पीळ मारायला आयेशा आणि प्रदीप बऱ्याच दिवसांनी सापडले होते. लग्नानंतर नोकरीसाठी प्रदीप खोपोलीला गेला, तेव्हापासून दोघांची क्वचितच भेट व्हायची. अलीकडे मात्र भेटी वाढल्या होत्या. दोन महिन्यांत चौथ्यांदा भेटत होतो आम्ही. अर्थात, गेल्या काही वर्षांत राखीपौर्णिमा दोघांनीही कधी चुकवली नव्हती. प्रदीप चैत्राकडून राखी बांधून घेतो तर आयेशा कैलासला राखी बांधते. रक्षाबंधनानंतर गोडाधोडाच्या जेवणावर ताव मारताना प्रदीप-आयेशाच्या लग्नाच्या आठवणी निघाल्या. आता आम्ही ते सगळं आठवून हसत असलो, तरी त्यावेळी किती तणाव सहन केला, हे आमचं आम्हालाच माहीत!

 प्रदीप एक खंदा कार्यकर्ता. युक्रांदमध्येही धडाडीनं काम केलेला. आमच्या चळवळीशी जोडला गेला आणि आमच्या घरचाही कायमचा सदस्य झाला. एचआयव्ही-एड्सविषयी प्रबोधनात्मक काम करताना हायवेवरचा उंब्रजचा स्पॉट त्याला दिला होता. ट्रकवर स्टिकर चिकटवणं, ट्रकचालकांशी संवाद साधणं हे त्याचं काम. तेव्हापासून सतत संपर्कात होता. पुढं मार्केटिंग कंपनीत एजंट म्हणून नोकरीला लागला आणि तिथंच त्याची आयेशाशी ओळख झाली. एकत्र काम करता-करता प्रेमात पडली दोघं एकमेकांच्या. लग्नाचं ठरवलं. आंतरधर्मीय लग्न. तीव्र विरोध ठरलेलाच. दोघं पळून आले. माहुलीच्या देवळात लग्न लावलं. मी आणि शैलजा साक्षीदार. लग्नाची कागदपत्रं दोघांच्या घरी पाठवली. मग जे व्हायचं तेच झालं. आयेशाच्या घरातले संतप्त होऊन आमच्या घरी. प्रचंड गदारोळ आणि तणाव. कसाबसा तो निस्तरला. पण प्रदीपच्या घरच्यांनी मात्र शांतपणे सांगितलं, "आम्ही त्याच्या नावानं अंघोळ करून मोकळे झालोय." यथावकाश प्रदीपला खोपोलीत नोकरी मिळाली आणि दोघं तिकडे राहायला गेले.

 “ताणतणावात स्थिर आणि हसतमुख राहण्याची सवय तुम्हा दोघांना तेव्हापासूनच लागली असणार," या माझ्या वाक्यानं गप्पांचा शेवट झाला आणि आम्ही हॉलमध्ये आलो. एरवी सतत लगबग करणारी आयेशा आता जपून पावलं टाकत होती. स्वाभाविकच होतं. साडेपाच महिन्यांची गर्भवती होती. पण

५०