पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/५६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आम्हाला कोर्टात नेहमी साथ देणारी. पण त्यासाठी प्रकरण न्यायप्रविष्ट होणं गरजेचं... त्यासाठी पुरावे आणि... त्यासाठी स्टिंग ऑपरेशन! सोपं नव्हतं; पण आवश्यक होतं. कार्यकत्यांचा निर्धार पाहून हुरूप आला. चर्चा सुरू असतानाच बबलूही आला. म्हणाला, “निघायचंना, ताई?"

 “जागरूकता, संवेदनशीलता वगैरे आपण म्हणतो; पण समाजातच काय, कोर्टातसुद्धा अजून फारसं गांभीर्य दिसत नाही. हा कायदा नेमका काय आहे, कसा आणि कुणी राबवायचाय, तक्रार कुणी दाखल करायची, तपास कुणी करायचा, याचा बऱ्याच जणांना गंधही नाही. कोर्टालासुद्धा वाटतं की, डॉक्टर लोक वेळ काढून आलेत आणि आपण कार्यकर्ते रिकामटेकडे!" हे ऐकून कैलास ड्रायव्हिंग करताना हसला. कोर्टातले बरेच अनुभव घेतलेले त्यानं. पत्रकारांनाही रिपोर्टिंग करताना तपशील समजावून सांगावा लागत असे. तिथंही डोकेफोड करायचं काम त्याचंच. पण आता पत्रकारांबरोबरच न्यायाधीशांच्याही कार्यशाळा सुरू झाल्या होत्या. कार्यकर्त्यांना परळीत सोडून मी नांदेडच्या जाणार होते, ते अशाच कार्यशाळेसाठी.

 "तुम्हाला सगळं व्यवस्थित समजलंय ना? बीडमध्ये नुकतंच स्टिंग केलंय. त्यामुळं मला सगळे ओळखतात. मी तिथं थांबून उपयोग नाही. पण नांदेडमधूनसुद्धा संपर्कात राहीन. शैलजा, मोबाइलचं ऑपरेशन नीट पाहून ठेवलंय ना?" शैलजाताईंनी होकार भरला. स्मार्टफोन त्यावेळी बाजारात आले नव्हते. पण 'जावा'चा एक हँडसेट आणि नवीन सिमकार्ड आम्ही खरेदी केलं होतं. क्लिनिकमध्ये गेल्यावर मला फोन लावायचा आणि बंद खोलीत जे बोलणं होईल, ते मला ऐकवायचं. माझ्या मोबाइलवर ते रेकॉर्ड करायचं, असं ठरलं होतं. गप्पा मारता-मारता मोबाइलच्या ऑपरेशनचीही उजळणी झाली. थेट परळीला न जाता गाडी अंबाजोगाईकडे वळली. तसंच ठरलं होतं. तिथल्या एका संस्थेचे कार्यकर्ते आमच्या परिचयाचे. वेळ आलीच तर चार माणसं पाठीशी उभी राहावीत, एवढाच हेतू. त्या मंडळींनी आमची मुक्कामाची सोय करून ठेवली होती. अनिश्चितता आणि काहीसा तणाव अशा वातावरणातच आम्ही झोपी गेलो.

 सकाळच्या ताज्या वातावरणात तणाव हलका करण्याचे नेहमीचे हातखंडे वापरून आम्ही सगळे हसत-हसत अंबाजोगाईहून परळीला निघालो. त्यातच प्रदीपला उलट्या होऊ लागल्या. त्याला गाडी लागायची. त्यातही आम्ही विनोद

५२