मुक्तांगणमध्ये महिला दिनाचा कार्यक्रम आम्ही सर्वप्रथम १९८९ मध्ये केला. कार्यक्रमाला वैद्यकीय क्षेत्रात निष्ठेनं काम करणारे एक डॉक्टर आले होते. कार्यक्रमानंतर आमच्या गप्पा रंगल्या आणि बोलता-बोलता त्यांनी आम्हाला एका संशयास्पद घटनेची माहिती दिली. सातारच्या पोवई नाक्यावर एका डॉक्टरांच्या दवाखान्यात छोटीशी खोली होती. दवाखान्याच्या सुटीदिवशी तिथं रांग लागायची. खूप मोठ्या प्रमाणावर काहीतरी चुकीचं चाललंय आणि त्याबाबत शहानिशा करायला हवी, असं ते सांगत होते. आम्हालाही सगळं विचित्र वाटलं. परंतु नेहमीच्या कामाच्या गडबडीत कालांतरानं आम्हाला या गोष्टीचा थोडा विसर पडला. आम्ही नुकतंच मोफत कायदेविषयक सल्ला आणि सहाय्य केंद्र सुरू केलं होतं. सहा महिन्यांनी एक धक्कादायक घटना घडली.
एक माणूस प्लास्टिकच्या काळ्या पिशवीतून चक्क भ्रूण घेऊन आमच्याकडे आला. डॉक्टरांनी आपल्याला फसवलं, अशी त्याची तक्रार होती. पोवई नाक्यावरच्या 'त्याच' छोट्या खोलीत सुट्टीदिवशी येणाऱ्या डॉक्टरांविषयी त्याला आमच्याकडे तक्रार करायची होती. या डॉक्टरांनी मुलगी समजून मुलगा पाडला, असं तो सांगत होता. पाडलेला भ्रूण पिशवीतून घेऊन तो आमच्याकडे आला होता. परंतु त्यानंही गुन्हाच केला होता. पीएनडीटी कायदा नुकताच लागू झाला होता; त्यामुळं 'तुझ्यावर गुन्हा दाखल होईल, असा उलटा दम आम्ही त्याला दिला. त्यानं दिलेल्या माहितीनुसार, हे डॉक्टर कोल्हापूरहून साताऱ्यात येऊन हे प्रकार करतात, हे समजलं. योगायोगाची बाब म्हणजे शैलाताईंचं माहेर कोल्हापूरच. हे डॉक्टर राजारामपुरीत त्यांच्या शेजारीच राहायचे. शैलाताईंचं घर मोठं. घराच्या निम्म्या भागात होस्टेल होतं आणि निम्म्या भागात डॉक्टर राहायचे. इयत्ता चौथीत असतानाच डॉक्टरांचं कुटुंब तिथं राहायला आलं होतं. त्यामुळं डॉक्टर लहानपणापासून शैलाताईंच्या पाहण्यात होते. शैलाताईंचं लग्न झाल्यानंतर डॉक्टरांनी कोल्हापुरात मोठं हॉस्पिटल बांधलं. आणखीही एक 'कनेक्शन' जुळलं होतं. आतापर्यंत आम्ही तीन स्टिंग ऑपरेशन केली होती. त्यात पकडलेल्या एका