"आमच्या भागात तर उघडउघड चालतंय..." अशरुबा गोरे सहज बोलून गेला होता आणि त्याचे शब्द तंतोतंत खरेही ठरले होते. आमचा हा कार्यकर्ता केज तालुक्यातला. बीड जिल्ह्याची खडान्खडा माहिती असलेला. जन्माआधीच मुलींच्या जिवावर उठणाऱ्या आणि वैद्यकीय पेशाला कलंक लावणाऱ्या डॉक्टरांवर आम्ही कसं जाळं टाकतो, हे त्यानं पाहिलेलं. त्यानं दिलेल्या माहितीनुसार खरोखर सगळं काही अगदी उघड चाललंय, याचा अनुभव आम्हाला फोनवर बोलताना आलेला. त्यानंच दवाखान्यांचे नंबर मिळवलेले. आम्ही लैंडलाइनवरून फोन केले होते. "मुलगा आहे की मुलगी, हे तपासायचंय," असं २००७ मध्ये आम्ही चक्क फोनवरून उघडपणे बोलू शकलो होतो आणि पलीकडून भरभरून प्रतिसादही मिळाला होता. एकाच दिवसातल्या तब्बल आठ दवाखान्यांच्या अपॉइन्टमेन्ट्स, त्याही खुद्द बीड शहरातल्या, मिळवण्यात आम्हाला यश आलं होतं आणि आतापर्यंतच्या
सगळ्यात मोठ्या आणि सगळ्यात अपरिचित अशा या स्टिंग ऑपरेशनसाठी आम्ही निघालो होतो. बीड आजपावेतो फक्त नकाशावरच पाहिलेलं होतं.
त्यावेळी आमची लाल रंगाची ट्रॅक्स होती. कैलासचं ड्रायव्हिंग सफाईदार होतं. गाडीत माझ्यासोबत शैलाताई, माया, बबलू आणि अवघडलेल्या अवस्थेतली सरिता. खरं तर आज घरच्यांचा थोडा हिरमोड करूनच मी बाहेर पडले होते. संजीवच्या प्रमोशनची आज पार्टी होती. विभागप्रमुख म्हणून आपल्या पतीला बढती मिळाली, या आनंदात असायला हवं होतं मी. आनंद होताच; पण आखलेल्या मोहिमेची धाकधूक पार्टीत रमू देत नव्हती. पार्टी संपल्यावर आमच्यापैकी कुणीच घरी गेलं नाही. सगळ्यांच्या डोळ्यासमोर एकच टार्गेट होतं आणि ते गाठणं फारसं सोपं नाही, याची सुज्ञ जाणीवही होती. मुक्कामापुरते कपडेलत्ते आणि जुजबी साहित्य इकडून-तिकडून जमा करून आम्ही स्टार्टर मारला, तेव्हा संध्याकाळचे सात वाजून गेले होते. अजिबात ठाऊक नसलेल्या रस्त्यावरून आम्ही प्रवास सुरू केला होता.