Jump to content

पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 पंढरपूरमार्गे बीडच्या सर्किट हाउसवर पोहोचलो, तेव्हा पहाटेचे तीन वाजले होते. मनात धाकधूक घेऊनच सगळे झोपले. सकाळी दवाखाने उघडायच्या वेळेपर्यंत आवरून तयारही झाले गाव अगदीच अपरिचित. कुणीच ओळखीचं नाही. एवढी सगळी ठिकाणं शोधायची कशी? हा प्रश्न होताच. पण 'अशा' ठिकाणांचे पत्ते रिक्षावाले अचूक सांगतात, हा आजवरचा अनुभव. त्या डॉक्टरांच्या हॉस्पिटलचा पत्ताही एका रिक्षावाल्याकडूनच मिळाला. “फार लांब नाही; चला चालतच सोडतो," असं म्हणून तो आम्हाला हॉस्पिटल दाखवायला आला. हे हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटलच्या अगदी समोर होतं. म्हणजे, ज्या सिव्हिल सर्जनने नियमबाह्य गोष्टींवर देखरेख करणं अपेक्षित असतं, त्यांच्या अगदी डोळ्यासमोर हे सगळं चाललं होतं! डॉक्टरांची वाट बघत काही पेशंट बसलेले; पण डॉक्टर गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात गुंतलेले. अनोळखी गावात आमच्या कामाचा श्रीगणेशा गणेश चतुर्थीलाच होत होता.

 आमच्यापैकी प्रत्येकाची कामं नेहमीप्रमाणं ठरलेली होती. सगळ्यांनी वेड पांघरून पेडगावला जायचं. काम फत्ते होईपर्यंत कुणी कुणाला ओळखसुद्धा द्यायची नाही. योग्य वेळी स्थानिक मीडियाला माहिती देण्याचं काम कैलासचं. प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना माहिती देणं आणि पुढचे सोपस्कार करणं ही माझी जबाबदारी. तपासणी होईपर्यंत दवाखान्यातलं सगळं काम कुशलतेनं हाताळण्याचं काम शैलाताईंचं. बबलू, माया जणू आमच्याबरोबर नसल्यासारखेच. आमच्याकडे न पाहता परिस्थितीवर बारकाईनं नजर ठेवणारे. बाहेर गणपतीच्या मिरवणुकांचे आवाज, गुलालाची उधळण, बँडचे आवाज सुरू झालेले.

 गणपतीची पूजा आटोपून डॉक्टर बनियन आणि हाफ पँटवरच घरातून दवाखान्यात आले. बरेच पेशंट बसलेत हे बघून गणेश चतुर्थीला 'लक्ष्मी' घरी चालून आल्याचे प्रसन्न भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसले. सरिताची सोनोग्राफी केली. 'मुलगाच आहे; पण खात्री करून घेऊ,' असं डॉक्टर म्हणाले. या बाबतीतही डॉक्टर 'सेकंड ओपिनियन' घेतात हे आम्हाला नवीनच होतं! धाकधूक वाढत होती आणि डॉक्टरांनी ओपिनियनसाठी बोलावलेल्या व्यक्तीला बघून तर आम्ही चाटच पडलो. चक्क सिव्हिल हॉस्पिटलमधल्या

३१