पान:सौंदर्यरस.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९२
सौंदर्यरस
 

एक महत्त्वाचा सिद्धान्त सांगितला आहे. ते म्हणतात, 'वाङ्मयाचा जन्म भौतिक शास्त्रांच्या आधीचा असून सर्व शास्त्रांना पुरून अखेरही तेच उरणार आहे. ज्ञानेंद्रियापेक्षा मन हे श्रेष्ठ आहे, या मनातच भावना निर्माण होतात. या भावनांनी मानवाचा संसार चालतो. तो शास्त्रांचे साहाय्य घेईल; पण त्यावाचून त्याचे अडणार नाही. वाङ्मयाचे तसेच आहे. ज्या वेळी भौतिक शास्त्रे जन्माला आली नव्हती त्या वेळी कवी काव्ये लिहीतच होते. पुढे शास्त्रे जन्माला आली म्हणून काव्ये थांबली नाहीत. उलट शास्त्रांची मदत घेऊन काव्य वाढीसच लागले.'
 मेकॉलेच्या मताचे खंडन करताना केळकरांनी आणखी एक असाच महत्त्वाचा सिद्धान्त सांगितला आहे. अज्ञान आणि प्रतिभा ही समानार्थक नव्हेत, एकरूप नव्हेत, हा तो सिद्धान्त होय. ती समानार्थक किंवा एकरूप आहेत, असे गृहीत धरूनच मेकॉलेने आपले मत मांडले असले पाहिजे, असे ते म्हणतात. भौतिक ज्ञान वाढले म्हणजे काव्य ऱ्हास पावते, या म्हणण्याचा अर्थच असा की, ज्ञानामुळे प्रतिभा क्षीण होते. अज्ञानाच्या काळात ती प्रबळ असते, म्हणूनच त्या काळात उत्तम काव्ये निर्माण होतात, असा मेकॉलेचा भावार्थ. पण हे गृहीतच चूक आहे. कवी कल्पना करतो ती अज्ञानामुळे नव्हे उलट दोन्ही वस्तूंचे उत्तम ज्ञान त्याला असते, म्हणूनच त्यातील सादृश्य तो आकळू शकतो. कालिदासाने सर्व शास्त्रांतील उपमाने निवडून आपल्या कामास लावली आहेत, प्रणव, प्राक्तन, स्वाहा, श्रुतिस्मृती, शब्दशक्ती, धर्मगती, उत्सर्ग अशा सर्व शास्त्रांतून त्याने उपमा घेऊन आपली काव्ये सजवली आहेत.

 मध्यभारतीय कविसंमेलनात भाषण करताना केळकरांनी हा विषय आणखी स्पष्ट केला आहे. ते म्हणतात, 'शास्त्रीय सत्य व काव्य ही दोन नाहीत. शास्त्रीय सत्याचे तेज, त्याला काव्याचे तेज मिळाल्यामुळे, अधिकच चमकू लागते. शास्त्रीय ज्ञानाच्या दुधात काव्यबुद्धीची भर ही सारखेप्रमाणे आहे. यामुळे सहृदय भौतिक शास्त्रज्ञदेखील काव्यदृष्टीची अपेक्षा करतात व तिची मदत घेतात. उलट खोल बुद्धीचे विशाल शक्तीचे कवी हेदेखील