पान:सौंदर्यरस.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
जीवनाचे भाष्यकार तात्यासाहेब केळकर
९३
 

शास्त्रीय ज्ञानाचा अव्हेर करीत नाहीत. किंबहुना ते कवी नसते तर तत्त्वज्ञानी झाले असते.'

 बडोद्याच्या साहित्यसंमेलनात तात्यासाहेबांनी आपली वाङ्मयाची सुप्रसिद्ध व्याख्या मांडली होती. 'खरी सविकल्प समाधी उत्पन्न करू शकते ते वाङ्मय' ही ती व्याख्या होय. या व्याख्येमागेही मानवी मनासंबंधीचा त्यांचा एक महत्त्वाचा सिद्धान्त आहे. मानवी आत्म्याला परमात्म्याशी एकरूप व्हावे, अशी सदैव तळमळ असते. ती त्याची इच्छा ललित साहित्याच्या वाचनाने बरीचशी तृप्त होते. म्हणूनच मनुष्याला कथा-कादंबरीच्या वाचनाने काव्यश्रवणाने आनंद होतो. काव्यवाचनापासून आनंद का होतो याचीही मीमांसा अशा रीतीने या व्याख्येत येऊन जाते.
 साहित्याच्या वाचनाने आत्म्याची परमात्म्याशी एकरूप होण्याची इच्छा कशी तृप्त होते ? काव्य वाचीत असताना त्यात ज्या व्यक्तिरेखा पुढे येतात त्यांच्याशी आपण तादात्म्य पावत असतो. शकुंतला सासरी जाऊ लागली तर कण्वाला दुःख व्हावे हे ठीक. पण आपल्याला का दुःख व्हावे ? त्याचे कारण असे की, आपण कण्वाशी तादात्म्य पावतो म्हणून आपल्याला दुःख होते. याचा अर्थ असा की, देह, इंद्रिये यांची बंधने क्षणभर उल्लंघून आपला आत्मा जास्त व्यापक रूप घेतो.
 हीच विचारसरणी पुढे नेऊन पहा. 'तुझे आहे तुजपाशी' या नाटकात एकाच वेळी रंगभूमीवर आचार्य, गीता, सतीश, काकाजी, श्याम, उषा इत्यादी व्यक्ती उभ्या असतात आणि त्यांचा संवाद चालू असतो. अशा वेळी क्षणभर या व्यक्तींशी तर क्षणभर त्या व्यक्तीशी आणि मधूनमधून सर्व व्यक्तींशी आपण एकरूप होत असतो. तसे झाल्यावाचून त्यांच्या सुखःदुखांचा सहानुभव आपल्याला येणारच नाही. आता एकदम इतक्या व्यक्तींशी तादात्म्य पावल्याने आत्म्याची व्यापक रूप धारण करण्याची इच्छा जरा जास्त प्रमाणात तृप्त होणार हे उघडच आहे. हे सर्व साहित्यातील रसामुळे होते. याच्या जोडीला अलंकार आले की जड वस्तूंशीसुद्धा आपल्याला एकरूप होता येते. द्रौपदी ही वीज होती, सिंधू गरीब गाय होती, सुभद्रा कमलासारखी होती, तानाजी सिंह होता, तात्यासाहेब वटवृक्षासारखे होते- अशा