पान:सौंदर्यरस.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
जीवनाचे भाष्यकार तात्यासाहेब केळकर
९१
 

लेला असेल तितकी त्याच्या विनोदाला म्हणजे टीकेला अधिक किंमत येईल. त्यातही अशा तत्त्ववेत्त्याला मनुष्यमात्राविषयी प्रेम असले तर त्याचा विनोद जास्त वरच्या पातळीवरचा होतो. तात्यासाहेबांच्या मते मनुष्यजातीविषयी प्रेम असल्यावाचून चांगला विनोद होणे शक्यच नाही.
 चित्रकला ही विनोदाच्या कशी उपयोगी पडते ते सांगताना तात्यासाहेबांनी व्यंगचित्राचा निर्देश केला आहे. तेव्हा सध्याचे प्रसिद्ध व्यंगचित्रकार जे लक्ष्मण त्याचीच काही उदाहरणे देऊन त्यांचे वरील विचार स्पष्ट करतो.
 रस्त्याच्या कडेला बसणारा ज्योतिषी एका लहान मुलाचा एक हात पाहून त्याला भविष्य सांगत आहे. तो म्हणतो, 'तू मोठा झाल्यावर तुला खूप पैसा मिळेल. तू बंगला बांधशील. तुला बायको सुरेख मिळेल. मोटारही तू घेशील. पण आजच मोटारीसाठी नाव नोंदवून ठेव.'
 सरकारी अधिकाऱ्याचे भाषण चालले आहे. त्याला त्याचा कारकून मागून हळूच सांगतो, 'सर, पंचवार्षिक प्लॅन म्हणण्याऐवजी आपण पंचवार्षिक प्लॉट म्हणत आहात.' विनोद म्हणजे वस्तुस्थितीवर टीका याचे यापेक्षा चांगले उदाहरण कोठे सापडणार ?
 विनोदबुद्धीचे महत्त्व सांगताना तात्यासाहेब म्हणतात, 'ज्याला विनोदबुद्धी नाही तो एक मुक्त किंवा पशू असला पाहिजे, हे म्हणणे पुष्कळ अंशी खरे आहे. या दोन टोकांच्या मधे किती तरी जागा आहे. ती व्यापणाऱ्यांच्या अंगी हास्यविनोद- पात्रता असते, आणि या मोठ्या समुदायातूनच समाजोपयोगी कामे करणारी माणसे निघतात. हास्यविनोदाच्या बाबतीत पुष्कळ वेळा इसापनीतीतील कोल्हा आणि द्राक्षे ही गोष्ट लागू पडण्यासारखी आहे. म्हणजे असे की, हास्यविनोदास नावे ठेवणारे लोक त्याची निंदा करून किंवा त्याला नाके मुरडून फक्त आपली तद्विषयक अपात्रता किंवा असामर्थ्य झाकू पहातात. जी गोष्ट आपल्याला येत नाही तिची महती होईल तितकी कमी करू पहाणे हा मनुष्यस्वभावाचा निसर्गसिद्धच दोष आहे.'

*

 'भौतिक ज्ञानाची जशी वाढ होते, तसतसा काव्याचा ऱ्हास होतो' या मेकॉलेच्या मतावर टीका करताना तात्यासाहेबांनी मानवी संसाराविषयी