पान:सौंदर्यरस.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९०
सौंदर्यरस
 

 हास्यविनोदाची जी मीमांसा तात्यासाहेबांनी केली आहे तीवरूनही त्यांच्या जीवनविषयक तत्त्वज्ञानाची बरीच कल्पना येते. या विषयावर त्यांनी स्वतंत्र ग्रंथच लिहिला आहे. त्यात त्यांनी एका ठिकाणी म्हटले आहे की, एकंदर जीविताविषयी आपली काय कल्पना आहे, यावर जीवितक्रमामध्ये आपण विनोदाला कोणते स्थान देतो हे अवलंबून असते. आणि याच अनुरोधाने त्यांनी मराठीतील विनोदाच्या इतिहासाचे विवेचन केले आहे.

 पूर्वीच्या काळी मराठी वाङ्मयात आणि समाजातही विनोदाला फारशी प्रतिष्ठा नव्हती. त्यामुळे मराठीत खरा विनोद इंग्रजी साहित्याशी आपला परिचय झाल्यानंतरच अवतरला. याच्या कारणांची कोल्हटकरांनी जी मीमांसा केली आहे तीच तात्यासाहेब केळकरांना मान्य आहे. व्यवहारापेक्षा परमार्थाचे, प्रवृत्तीपेक्षा निवृत्तीचे, व कर्मयोगापेक्षा कर्मसंन्यासाचे वर्चस्व समाजमनावर असले म्हणजे संसार मिथ्या आहे, कामक्रोधादी षड्रिपूंचे दमन करणे हेच मनुष्याचे कर्तव्य, ते केल्यावाचून त्याची जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्तता होत नाही, याच विचाराचे चोहोकडे साम्राज्य दिसून येते. ऐहिक सुखाविषयी जेथे इतके तीव्र औदासीन्य असते, तेथे विनोदाला फारसा अवसर नसतो. मराठीत प्रारंभीच्या काळचे कवी हे संत- कवी होते. त्यांची बहुतेक काव्यरचना धर्मपर असल्यामुळे हास्यरसावर पूर्वीच्या युगापेक्षाही कडक बहिष्कार पडला. एकनाथ, तुकाराम यांच्या वाङ्मयात काही प्रमाणात विनोद आढळतो. पण ती स्थळे अपवादात्मक होत. लोकगीते व लोककथा यांत मात्र जगातल्या कोणत्याही भाषेप्रमाणे मराठीतही बराच विनोद आढळतो. कारण लोकांचे ऐहिक जीवन हा त्यांचा विषय असतो.

 पण ऐहिक जीवनाचा लोभ जसा विनोदाला अवश्य असतो, तशीच भौतिकविद्येची प्रगती हीही अवश्य असते. त्या विद्येने संपन्न असा बुद्धिजीवी मध्यमवर्ग पाश्चात्त्यांच्या वर्चस्वामुळे जेव्हा भारतात उदयास आला, तेव्हाच येथे खरा श्रेष्ठ प्रतीचा विनोद निर्माण झाला. विनोद ही वस्तुस्थितीवर, जीवनावर, संसारावर केलेली टीका असते. जग आहे कसे आणि असावे कसे, यांविषयी अभिप्राय त्यात प्रगट केलेला विचारात जितका मुर-