पान:सौंदर्यरस.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८८
सौंदर्यरस
 

माहीत आहे. राज्यकारभार बदलला, कारखाने, व्यापार, रेल्वे, रस्ते या नव्या गोष्टी आल्या, शाळा, विद्यापीठे स्थापन झाली. शहरे वाढू लागली, घरबांधणी नवी झाली. स्थानिक स्वराज्य आले, कौन्सिले आली, पोस्ट आले, तार खाते आले- सर्व सर्व सृष्टी बदलली. ही नवी सृष्टी आल्यामुळेच नवी दृष्टी लोकांना प्राप्त झाली. म्हणजेच येथली मानसिक सृष्टीही बदलली आणि म्हणून नवे साहित्य जन्माला येऊ शकले. पुष्कळ वेळा नवी सृष्टी येऊनही लोकांना नवी दृष्टी प्राप्त होत नाही. आफ्रिकन राष्ट्र दक्षिण अमेरिकेतील राष्ट्रे यांची स्थिती अशी आहे. जेथे नवी सृष्टी स्वकीय वा परकीय राज्यकर्त्यांनी लादलेली असते आणि त्याबरोबरच लोकांना नवी दृष्टी देण्याचे बुद्धिपुरस्सर टाळलेले असते, तेथे नवे साहित्य निर्माण होत नाही. नवी सृष्टी काही काळ तरी जडरूपातच तेथे रहाते. ती नव्या संस्कृतीला जन्म देत नाही. आणि नवी संस्कृती नाही म्हणजे नवे साहित्य नाही पण भारतात सुदैवाने तसा प्रकार घडला नाही. येथे नवी सृष्टी इंग्रज राज्यकर्त्यांनी आणली हे खरे. त्याबरोबरच त्यांनी पाश्चात्त्य विद्येचाही प्रसार करण्यास प्रारंभ केला, आणि त्यापेक्षाही जास्त म्हणजे येथल्या लोकांनी त्या विद्येचा व तिच्याबरोबर येणाऱ्या संस्कृतीचाही अतिशय आदर केला व समाजाला नवी दृष्टी देण्याचाही आटोकाट प्रयत्न केला. त्यामुळे येथे चाळीस-पन्नास वर्षांतच साहित्यसृष्टीत मोठे परिवर्तन घडून आले.
 तिसरे कारण म्हणजे नवी हृष्टी किंवा तुष्टी हे होय. आज एखादा हरिजन आपल्या शहराचा महापौर झाला तर लोकांना आनंद होतो. ही नवी तुष्टी होय. पन्नास वर्षापूर्वी याचा संताप आला असता. आजही ग्रामीण भागात असा संताप येतो. हरिजन गावचा पाटील झाला तर लोक त्याला यमयातना देतील. त्याने तांब्या पितळेची भांडी वापरलेली सुद्धा त्यांना चालत नाहीत. अशा हरिजनांचा गावचे लोक बहिष्कार घालून सूड घेतात. म्हणजे तेथे नवी तुष्टी आली नाही, असा अर्थ होतो. नवी दृष्टी नाही म्हणूनच नवी तुष्टी नाही, हे उघडच आहे. ग्रामीण भागात नवी जडसृष्टी आली आहे. शेतीची नवी अवजारे आली आहेत, वीज आली आहे, मोटारी, स्कूटर ही वाहतुकीची यंत्रे आली आहेत. तरीही समतेची, स्वातंत्र्याची, बुद्धिप्रामाण्याची, इहवादाची नवी दृष्टी तेथे आलेली नाही. म्हणून तेथून अजून नवे