पान:सौंदर्यरस.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
जीवनाचे भाष्यकार तात्यासाहेब केळकर
८७
 

 तात्यासाहेब केळकर यांनीही वाङ्मय व टीका याविषयी लिहिताना टीका शास्त्राविषयी वर विवेचिलेले मत मांडले आहे. ते म्हणतात, "एका बाजूस वाङ्मयाचा व मनुष्यजीवनाचा जो संबंध तोच दुसऱ्या बाजूस टीकाशास्त्राचा व वाङ्मयाचा आहे.' मनुष्यजीवनाचा अर्थ सांगणारे ते वाङ्मय असे म्हटले, तर 'वाङ्मयाचा अर्थ सांगणारे ते टीकाशास्त्र' असे म्हणता येईल."

 या दृष्टीने आता आपल्याला तात्यासाहेबांच्या टीकावाङ्मयाचा परामर्श घ्यावयाचा आहे.

 वाङ्मयात फार मोठे परिवर्तन केव्हा होते ? क्रांती केव्हा होते ? नवे वाङ्मय व वाङ्मयप्रकार केव्हा निर्माण होतात ? 'अर्वाचीन मराठी साहित्य' या ग्रंथाचा उपसंहार त्यांनी लिहिला आहे. त्यात त्यांनी या प्रश्नाची चर्चा केली आहे. ('साहित्य खंड : पृ. १११) टीका म्हणजे काय हे सांगताना, 'त्या त्या कलांची उत्पत्ती स्थिती आणि अपकर्ष किंवा नाश यांच्यासंबंधीचे नियम किंवा सिद्धान्त ज्यात सांगितले आहेत असा वाक्प्रबंध' असे त्यांनी अन्यत्र म्हटले आहे. आणि तीच व्याख्या मनापुढे ठेवून प्रश्नाची चर्चा केली आहे व वाङ्मयाचा 'अर्थ' सांगितला आहे. त्यांच्या मते नवी सृष्टी, नवी दृष्टी व नवी हृष्टी किंवा तुष्टी ही वाङ्मयात नवे युग निर्माण होण्याची तीन कारणे होत. अमेरिका १७७६ साली स्वतंत्र झाली आणि तेथील सृष्टी पालटली. रशियाने १८१२ साली नेपोलियनचा मोठा पराभव केला, व तेथे अगदी नवी सृष्टी निर्माण झाली. महाराष्ट्रात १८१८ साली इंग्रजांचे राज्य प्रस्थापित झाले आणि येथल्या जीवनात तळापासून क्रांती झाली. या तीन घटनांमुळे या तीन देशांतील साहित्यातही अशीच क्रांती घडून आली, हे सर्वश्रुतच आहे. या तीनही देशांतील साहित्याचा सविस्तर वृत्तान्त देऊन तात्यासाहेबांनी नवी सृष्टी, नवी दृष्टी व नवी तुष्टी यांचा अर्थ विशद केल आहे. आपण येथे महाराष्ट्रापुरताच विचार करू. इंग्रजी राज्य स्थापन झाल्यावर येथे अगदी सर्वस्वी नवी सृष्टी निर्माण झाली, हे आता सर्वांनाच