पान:सौंदर्यरस.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८६
सौंदर्यरस
 

जीवनभाष्य म्हणतात. 'इंटरप्रिटेशन ऑफ लाइफ', 'क्रिटिसिझम ऑफ लाइफ', 'फिलॉसफी ऑफ लाइफ' असे शब्द इंग्रजीत रूढ आहेत. त्यावरूनच जीवनभाष्य, संसृतिटीका हे शब्द मराठीत बनवलेले आहेत.
 ललित साहित्यातून जसा लेखकाचा जीवनविषयक दृष्टिकोण प्रगट होतो तसाच तो त्याच्या समीक्षालेखांतूनही प्रगट होतो. साहित्य हे जीवनाचे भाष्य होय आणि टीका किंवा समीक्षा हे त्या भाष्यांचे भाष्य होय. या दुसऱ्या भाष्यकाराला म्हणजे टीकाकारालाही जीवनाविषयी सम्यक् ज्ञान असणे साहित्यिकाइतकेच अवश्य असते. गीतेवर श्रीशंकराचार्यांनी भाष्य लिहिले. आता त्या आचार्याच्या भाष्यावर ज्यांना अनुकूल प्रतिकूल टीका लिहायची असेल, त्यांना मूळ गीतेचे उत्तम ज्ञान असलेच पाहिजे. गीतेविषयीचा त्यांचा दृष्टिकोणही निश्चित असला पाहिजे आणि त्यांच्या टीकेतून तो प्रगट झाला पाहिजे. साहित्य-समीक्षकाचे, टीकाकाराचे तसेच आहे. तो साहित्यावर टीका करतो. पण ते साहित्य ही ज्या संकृतीविषयी, जीवनाविषयी टीका असते ते जीवन त्याला साहित्यिकाइतकेच ज्ञात असले पाहिजे. त्याचा त्या जीवनाविषयीचा दृष्टिकोण त्याच्या टीकेतून आविष्कृत झाला पाहिजे.
 दुसऱ्या एका दृष्टीने पहा. शेती, कारखानदारी, प्रशासन, नोकरी, वकील, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनियर यांचे व्यवसाय. खरेदीविक्री, राज्यकारभार, गृहकृत्ये, अपत्यसंगोपन इत्यादी अनेकविध उद्योग जीवनात मनुष्य करीत असतो. त्याचप्रमाणे साहित्य-लेखन हाही एक उद्योग आहे. आणि त्या वरील उद्योगाविषयीचे विचार, त्याविषयीचे तत्त्वज्ञान (म्हणजे साहित्य) हे जसे जीवनभाष्य होते, त्याचप्रमाणे त्या उद्योगासारखाच 'साहित्य' हा जो उद्योग, त्याच्याविषयीची टीका हेही जीवनभाष्यच होईल, हे उघड आहे. म्हणून साहित्यसमीक्षक हाही जीवनाचा भाष्यकार ठरतो, हे मान्य होईल असे वाटते.
 तात्यासाहेब केळकर हे जीवनाचे भाष्यकार होते, हे आज सांगायचे आहे ते त्यांच्या ललितसाहित्याच्या आधारे नव्हे; तर त्यांच्या टीका लेखनाच्या आधारे सांगायचे आहे. आणि त्यासाठीच टीकाकारही साहित्यिका- सारखाच जीवनाचा भाष्यकार असतो हे आधी स्पष्ट केले आहे.