पान:सौंदर्यरस.pdf/९०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






जीवनाचे भाष्यकार
तात्यासाहेब केळकर



 साहित्यात जीवनाच्या भाष्याला फार महत्त्व असते. तो त्याचा प्रधान गुण मानला जातो. काही साहित्यशास्त्रज्ञ 'साहित्य म्हणजे जीवनभाष्य' अशी व्याख्याच करतात.

 प्रत्येक लेखकाचा, साहित्यिकाचा, कवीचा, जीवनाकडे पहाण्याचा एक स्वतंत्र दृष्टिकोण असतो. अनुभव, अवलोकन, वाचन, चिंतन, मनन यांतून जीवनाविषयी, संसाराविषयी, त्यातील धर्म, समाजरचना, नीतिअनीती, विज्ञान, शिक्षण, युद्ध, शांतता, स्त्रीपुरुषसंबंध, स्वातंत्र्य, प्रेम, बंधुभाव इत्यादी घटकांविषयी त्यांची काही मते बनलेली असतात. काही विचार निश्चित झालेले असतात. त्याने जीवनाचे काही तत्वज्ञान मनाशी सिद्ध केलेले असते. आणि कथा, कादंबरी, नाटक, काव्य हे लिहिताना कळत न कळत तो ते मांडीत असतो. तो जगाविषयी किंवा त्यातील घडामोडींविषयी या तत्त्वज्ञानाच्या आधारेच लिहितो. तो घटना कल्पितो, व्यक्ती निर्माण करतो, त्याही या तत्त्वज्ञानाला पोषक अशाच असतात. आणि त्यांच्या द्वाराच तो आपला जगाविषयीचा दृष्टिकोण, अभिप्राय स्पष्ट करतो. हा जो जगाविषयीचा त्यांचा अभिप्राय, हे जे त्याचे विचार, त्याचे जीवनाविषयीचे तत्त्वज्ञान, त्याला