पान:सौंदर्यरस.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सौंदर्यरस
 

आश्रय घ्यावा, त्याला आत्मार्पण करावे ही वृत्ती भक्तिरसाच्या बुडाशी आहे. याच्या उलट कोणाला तरी- बालकाला- आश्रय द्यावा, त्याचे पालन करावे या मूलवृत्तीतून वात्सल्य ही भावना व वात्सल्य हा रस निर्माण होतो. दुसऱ्याला जिंकावे, त्याला शरण आणावे, त्यावर प्रभुत्व गाजवावे, हाच अमर्ष किंवा संताप. यातून वीररसाची उत्पत्ती होते. मानवाच्या या सर्व मूलप्रवृत्ती, या वासना निसर्गदत्त आहेत. आणि स्वसंरक्षण, वंशसातत्य व वंशवर्धन यांसाठी निसर्गाने त्या त्याच्या ठायी योजिलेल्या आहेत. वर मानवी संस्कृतीचे जे वर्णन केले आहे त्यावरून रचना करावी, विसंगतीतून सुसंगती निर्मावी, निसर्गातील काही जड घटक एकत्र करून नवनिर्मिती करावी, ही एक काम, युद्ध, वात्सल्य यांसारखीच मानवाची मूलप्रवृत्ती आहे हे ध्यानात येईल. मॅकडुगल या विख्यात मानसशास्त्रज्ञाने सहजप्रवृत्तीच्या यादीत हिचे 'कन्स्ट्रक्शन'- रचना असेच नाव दिले आहे. रतिभावना म्हणजे स्त्री-समागमाची उत्कट इच्छा. तीच पुढे शृंगारभावनेत परिणत होते. वात्सल्य म्हणजे बालकाच्या लालनाची उत्कट इच्छा. हिच्यातूनच वत्सलरस उत्पन्न होतो. त्याचप्रमाणे रचनाप्रवृत्तीची व नवनिर्मितीची जी उत्कट इच्छा, तिच्यातूनच सौंदर्य रस निर्माण होतो. स्त्रीसंगातून, बाललालनातून, प्रभुत्वातून जेवढा आनंद मनुष्याला प्राप्त होतो तेवढाच, तितकाच उत्कट आनंद रचनेच्या, सुसंगतीच्या, म्हणजेच कलेच्या दर्शनाने त्याला लाभतो.
 हास्यरसाचे स्वरूप पाहिले तर ही कल्पना जास्त स्पष्ट होईल. सर्व हास्य विसंगतीतून, विकृतीतून निर्माण होते, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. एखाद्या लहान मुलाच्या डोक्यावर पगडी ठेवलेली पाहिली तर आपल्याला हसू येते. कारण त्याची मूर्ती व ते शिरोभूषण यात विसंगती आहे. 'एकच प्याल्या'- तील दारुड्ये, आगरकर-टिळकांचा निर्देश करू लागले की हसू येते; कारण त्यांची कृती व उक्ती यांत विसंगती आहे. अत्र्यांच्या एका नाटकात एक पुरुष, त्याचा हात धरणाऱ्या स्त्रीला, 'माझा विनयभंग होतो आहे' असे म्हणतो. ही विसंगती आहे. 'मानापमाना'तील लक्ष्मीधर सायंकाळी शिळोप्याच्या वेळी युद्ध करावे असे म्हणतो. ही विसंगती आहे. 'बायकांच्या मागे दडणारा मी वीर आहे' असे नूपुर म्हणतो, हे 'वीर' शब्दाचे विडंबन