पान:सौंदर्यरस.pdf/१०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
सौंदर्यरस
 

आहे. 'कवींचा कळप असतो' असे गडकरी म्हणतात. यात कवीची प्रतिष्ठा व कळप हा पशूंना लावला जाणारा शब्द यात विसंगती आहे. या विसंगतीमुळे वाचकांना, प्रेक्षकांना हसू येते. आणि त्यामुळे विनोदन, करमणूक होऊन आनंद प्राप्त होतो. त्याचप्रमाणे सुसंगती पाहून तसाच किंवा त्यापेक्षाशतपटीने जास्त आनंद मनुष्याला होत असतो. चित्रामध्ये निळा, हिरवा,पिवळा अशा रंगांतून एक सुसंगत मूर्ती निर्माण झालेली पाहून, आणि ती मूर्ती आपल्या मनात जी टिळकांची प्रतिमा असते तिच्याशी पूर्ण सदृश व सुसंगत आहे हे पाहून असाच आनंद होतो. गायनामध्ये सर्व सुरांचा एकमेळ झाला पाहिजे. बदसूर झाला, विसंगती दिसली की श्रोता त्रस्त होतो. सर्व आलाप, स्वर, आरोह-अवरोह, ताना यांत सुसंगती दिसली की मनाला अभूतपूर्व आनंद होतो. जी भावना जागृत झाल्यामुळे हा आनंद होतो ती सौंदर्यभावना. तीच परमोत्कटतेला गेली की तिला 'रस' पदवी प्राप्त होते. हे सर्व शास्त्रीय परिभाषेत पुढे मी मांडून दाखवणारच आहे. प्रथम ही कल्पना स्पष्ट करून घेऊ.

 कला ही नवनिर्मिती होय. आणि नवनिर्मिती म्हणजे काय? जोशा रेनाल्डस् या विख्यात इंग्लिश चित्रकाराने आपल्या 'डिसकोर्सेस ऑन आर्ट'या व्याख्यानात म्हटले आहे की, 'नवनिर्मिती म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून आपल्या स्मृतीत साठवून ठेवलेल्या प्रतिमांची नवी मांडणी, नवी रचना.' नवी चित्रकलाकृती पाहिली तरी तिच्यात विषय नवीन असतो असे नाही. कोणतेही विख्यात चित्र घेतले तरी त्याचे निरनिराळे भाग हे सामान्यच असतात. त्या सर्वांची जी जुळणी, जो सन्निवेश, तो नवा असतो. सर्व घटकांतून जी एकतानता, जी सुसंगती निर्माण होते तीत कलाकाराचे वैभव दिसते. ती सर्व कृती म्हणजे एका मनाचा आविष्कार, असे रूप या सुसंगतीमुळे येते. उत्कृष्ट शैलीचे रहस्य हेच आहे. रेनाल्डस् याने चित्रकलेसंबंधी जे म्हटले आहे ते माझ्या मते, सर्व कलांना लागू आहे. सर्व कला या नव्या रचना आहेत, नवे संधिबंध किंवा सु-रेखा आहेत. चित्र, शिल्प; संगीत, नृत्य, वास्तू, साहित्य- काव्य, नाटय- या सर्व कलाकृतींचे घटक.