पान:सौंदर्यरस.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सौंदर्यरस
 

अरूपाला दिलेला रूपाकार, सुरचना, निराकारातून निर्मिलेला आकार हेच त्याचे प्रधान लक्षण आहे असे आपल्याला दिसून येईल. याच अर्थाने आर्यावन एडमन याने 'आर्टस् अँड दि मॅन' या आपल्या पुस्तकात, सर्व मानवी संस्कृती ही एक कलात्मक रचनाच आहे, असे म्हटले आहे. तो म्हणतो, 'ज्या प्रमाणात जीवनाला आकार दिसू लागेल त्या प्रमाणात जीवन ही कला आहे. जेथे जेथे मानव भोवतालच्या भौतिक जगावर नियंत्रण प्रस्थापित करतो तेथे तेथे कला- संस्कृती दिसू लागते. जड द्रव्याला रचना आली, गतीला दिशा आली आणि आयुष्याला रेखा आली- म्हणजेच विश्वातील निराकाराला आपण इष्ट आकार दिला, जे बेबंध आहे ते सु-रेख केले की त्यालाच कला म्हणतात.'
 याचा अर्थ असा की रचना, सुसंगती किंवा 'शाकुंतला'वरील टीकेत राघवभट्टाने म्हटल्याप्रमाणे उचित सन्निवेश अथवा सुश्लिष्ट संधिबंध हा कलासौंदर्याचा आत्मा आहे. सर्व कलांचा तो समान धर्म आहे. आणि ही सुसंगती वा ही रचना पाहून पहाणाराच्या मनात जी भावना जागृत होते तिला सौंदर्यभावना असे म्हणतात.
 सौंदर्य ही एक भावना आहे हे सर्वमान्य आहे. ती स्वतंत्र भावना आहे की नाही याविषयी वाद आहे. पण भावना आहे. प्रेम, भीती, संताप यांसारखीच ती एक भावना आहे, याविषयी वाद नाही. याहून एक पाऊल आणखी पुढे जाऊन, सौंदर्य हा रस आहे, शृंगार, वीर, करुण, हास्य, भक्ती वत्सल यांसारखाच पण स्वतंत्र असा रस आहे, असा सिद्धान्त या लेखात मी मांडणार आहे.
 शृंगार, वीर, वत्सल, भक्ती या रसांचे स्वरूप वर्णिताना साहित्य- शास्त्रज्ञ असे सांगतात की, मुळात या सर्व भावना आहेत. आणि त्या उत्कटतेला आल्या की त्यांनाच रस पदवी प्राप्त होते. या प्रत्येक भावनेच्या मुळाशी मानवाच्या काम, अहंता, द्वेष, पालनवृत्ती, संघवृत्ती, युद्ध अशा ज्या सहज-प्रवृत्ती शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या आहेत त्यांपैकी कोणती तरी एक असतेच. स्त्रीला पाहून तिच्याशी संगत व्हावे अशी पुरुषाची सहजच प्रवृत्ती होते. हीच कामवासना हीच रतिभावना. कोणा तरी सर्वसमर्थाला शरण जावे, त्याचा