पान:सौंदर्यरस.pdf/८७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८२
सौंदर्यरस
 

तिने त्यांची शुश्रूषा केली. माझे ते मान्य झाले. शंकर मामंजी, सदूनाना, काकासाहेब, विठ्ठलभट, भाऊसाहेब यांच्या ओंगळ संसाराची चित्रे हरिभाऊंनी दाखविली तशीच शिवरामपंत, रघुनाथराव, गणपतराव, नानासाहेब, बळवंतराव, यांच्या संसाराची चित्रे दाखवून त्यांनी फोडलेल्या मूर्ती जोडून दाखविल्या आहेत. पातिव्रत्य, पितृभक्ती, गुरुजनांविषयी आदर, बहीण- भावंडांचे प्रेम, अपत्यवात्सल्य हे कुटुंबसंस्थेचे सर्व गुणवैभव हरिभाऊंना सनातन्यांइतकेच विलोभनीय वाटते. जुन्या रूढीमुळे, धर्माविषयीच्या विपरीत कल्पनामुळे, स्त्रीच्या अज्ञानामुळे हे वैभव नष्ट झाले आहे व रूढीचे भंजन करून ते पुन्हा समाजाला प्राप्त करून दिले पाहिजे हे तर त्याचे प्रतिपादन आहे. मुली शिकल्या, म्हणजे त्यांच्या अंगची सर्व शालीनता नष्ट होते, त्या कर्तव्यच्युत होतात, उद्धट होतात, देव-धर्म मानीत नाहीत हे विपरीत समज हरिभाऊंना नष्ट करावयाचे होते. म्हणून अनेक मुलींची, तरुण स्त्रियांची चित्रे रेखाटून त्यांनी कुटुंबसंस्थेचे रम्य व विलोभनीय चित्र समाजापुढे उभे केले. कमला ही पुनर्विवाहित दांपत्याची मुलगी, पण तिला आपल्या मातापित्यांविषयी निस्सीम भक्ती आहे, तिची पतिनिष्ठाही जुन्या काळच्या कसाला उतरणारी आहे. आणि दादासाहेबांची- आपल्या मामंजींची शुश्रूषा करून तिने त्यांचे मन जिंकले, हे दाखवून या नव्या मुली सासरच्या माणसांचाही पूर्वीइतकाच आदर ठेवतात, हे हरिभाऊंनी दाखविले आहे. भाऊ आणि ताई या बहीण- भावंडांचे प्रेम किती उत्कट होते ते 'मी' या कादंबरीत आपल्याला दिसते. बहीण-भावंडांच्या प्रेमाचे तितकेच हृदयंगम असे चित्र हरिभाऊंनी 'कर्मयोग' या कादंबरीत रेखाटले आहे. चंद्रशेखराची छोटी बहीण चंद्री हिच्या निर्व्याज बालभावाचे आपल्या तात्यावरील तिच्या भक्तीचे हरिभाऊंनी जे वर्णन केले आहे त्याला खरोखरच तोड नाही. 'मातृदेवो भव' या सुभाषिताला तर हरिभाऊंनी अनेक कादंबऱ्यांत मूर्तरूप दिले आहे. भाऊ व ताई यांची आई फार कजाग होती. संसारातील दुर्दैवामुळे ती निष्ठुर झाली होती. त्यामुळे तिने या दोघांना फार कठोरपणे वागविले. पण त्याच्या चित्तातली तिच्या विषयीची भक्ती अणुमात्र कमी झाली नाही. यमुना, सुंदरी, कमला, चंद्रशेखर, या सर्वांनी 'नमातुः परदैवतम् !' असेच आचरण ठेविले होते. ही संसारचित्रे दाखवून आपल्याला विवाहसंस्था,