पान:सौंदर्यरस.pdf/८६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
हरिभाऊंचा ध्येयदर्शी वास्तववाद
८१
 

पशूच होईल. तेव्हा वास्तव आणि ध्येय यात विरोधी तर काही नाहीच. तर ते अविभाज्य असते. आणि आजचे ध्येय ते उद्याचे वास्तव असे हरघडीस प्रत्ययास येत असते. आणि त्या उद्याच्या वास्तवावर परवाचे ध्येय उभे असलेले दाखविणे हीच खरी वास्तववादी दृष्टी होय. अगदी सत्य तेच वर्णन इतका काटेकोर जरी 'वास्तवाद' या शब्दाचा अर्थ घेतला तरी त्या कक्षेतही या ध्येयवादाचा समावेश अवश्य करावा लागेल. कारण प्रत्येक मानवाच्या चित्तात अत्यंत अल्प का होईना पण ध्येयवाद असतोच. म्हणजे ही वस्तुस्थितीच आहे. तिचे चित्रण वास्तवदर्शनात आलेच पाहिजे. न आले तर ते वास्तवदर्शन होणारच नाही. हरिभाऊंचा वास्तववाद असा ध्येयदर्शी आहे. मूर्ती फोडल्यावर ती जोडून पुन्हा तिची प्रस्थापना करणे ही जबाबदारी आहे असे ते मानतात.
 या दृष्टीने त्यांच्या व्यक्तिरेखांच्या विचारांचा व आचारांचा अभ्यास करणे उद्बोधक ठरेल. म्हणजे हरिभाऊ हे केवळ बेजबाबदार, पिसाट विध्वंसक टीकाकार नसून अत्यंत तळमळीचे समाजहितचिंतक आहेत, तत्त्ववेत्ते आहेत, हे आपल्या ध्यानात येईल. 'मी' मधील शिवराम पंतांनी आपली मुलगी मिशनऱ्यांच्या शाळेत पाठविली तेव्हा तिला कळकळीने त्यांनी उपदेश केला की, 'परधर्मीयांच्या शाळेत तू जात आहेस. तेथे शिक्षक ख्रिस्ती धर्माची महती गातील व हिंदुधर्माची निंदा-नालस्ती करतील. त्याने विचलित होऊ नको. ध्यानात ठेव की, हिंदुधर्मासारखा श्रेष्ठ धर्म नाही. आपला धर्म बरा असो वाईट असो. आपल्या धर्मात राहूनच आपल्याला कार्य करावयाचे आहे.' यावरून आपल्या हे ध्यानात येईल की, हरिभाऊंना धर्म नष्ट करावयाचा नव्हता तर त्यात परिवर्तन फक्त घडवावयाचे होते आणि तेही अशा हेतूने की या धर्माने मानवतेचे सुसंवर्धन व्हावे. त्यांनी कुटुंबसंस्थेची चित्रे काढली आहेत त्यावरूनही त्यांची विधायक वृत्ती स्पष्ट होईल. भाऊची बहीण ताई ही सासरी छळ असह्य झाला म्हणून ते घर सोडून माहेरी आली. पण पुढे पती अर्धांगाने आजारी आहेत, व आता त्यांची सेवा-शुश्रूषा करायला कोणी नाही, हे कळताच ती पूर्वीचे काहीही मनात न आणता धावत घरी गेली व अहोरात्र जागून
 सौं. ६