पान:सौंदर्यरस.pdf/८५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८०
सौंदर्यरस
 

सुधारक. त्याने वडिलाने ठरविलेले लग्न मोडून कमलेशी विवाह केला. तेव्हा संतापाने भडकून जाऊन 'माझा कारटा मेला' असे दादासाहेब म्हणू लागले. पण पुढे हेच दादासाहेब रेल्वे अपघातात सापडले व जखमी झाले. तेव्हा कमलेने त्यांची इतक्या भक्तिभावाने शुश्रूषा केली की, ते अगदी संतुष्ट झाले व माझी सून म्हणजे एक रत्न आहे' असे म्हणून त्यांनी 'तुमचा संसार सुखाचा होवो !' असा मुलाला व सुनेला आशीर्वाद दिला.

 हरिभाऊ मूर्तिभंजक असले तरी, 'मूर्ति फोडूनिया, देऊ जोडोनिया परी विकूनिया, टाकू न त्या । विकूनि टाकिती, तेचि हरामखोर, तेचि खरे चोर आम्ही नव्हो ॥ अशी केशवसुतांसारखी त्यांची विधायक वृत्ती होती. आणि जुन्यांचा विध्वंस, जुन्याचे भजन करताना नवे काय हवे ते सांगितल्याखेरीज वास्तववाद पुरा होतच नाही. किंबहुना नवे विधायक असे काही दिसल्यामुळेच मनुष्याच्या मनात जुन्याचा विध्वंस करण्याची प्रवृत्ती जागृत होते. वास्तववाद व ध्येयवाद अविभाज्य आहेत असे म्हणतात, ते याच अर्थाने हरिभाऊ जितके वास्तववादी होते तितकेंच ते कट्टर ध्येयवादी होते. लोकशिक्षण हा विदग्ध वाङ्मयाचा प्रधान हेतू होय असे त्यांचे मत होते. ध्येयवादावाचून त्याला अर्थच होणार नाही. प्रा. ना. सी. फडके यांनी एका लेखात याचे उत्तम विवेचन केले आहे. मुलगी मॅट्रिक झाली तेव्हा वडिलांनी तिला सांगितले की तुला पुढे शिकवावे खरे, पण सामर्थ्य नाही. तेव्हा तुझ्या लग्नाचा विचार करू. वडिलांना सामर्थ्य नाही हे मुलीला मान्य होते. पण तिला शिकून डॉक्टर होऊन लोकसेवा करावयाची होती. म्हणून तिनें शिकवण्या धरल्या, नोकरी धरली. यात तिला फार त्रास होऊ लागला, आता मध्यमवर्गीयांच्या या दारिद्र्याचे वर्णन, त्या त्रासाचे, त्या हालअपेष्टांचे वर्णन हे वास्तववर्णन झाले, पण तो त्रास मुलीला कशामुळे झाला? तिच्या ध्येयामुळे आणि हेच प्रत्येक मनुष्याचे असते. डॉक्टर होणें, न्यायाधीश होणे हे प्रत्येकाचे ध्येय नसेल. पण उद्या आजच्यापेक्षा काही बरी, काही वरची स्थिती प्राप्त करून घ्यावी अशी आकांक्षा प्रत्येक माणसाच्या, चित्तांत आहोरात्र बसत असते. यालाच ध्येयवाद म्हणतात. मनुष्य हा मनुष्य ठरतो तो या ध्येयवादामुळेच होय. तो त्याच्या आयुष्यातून वजा केला तर तो