पान:सौंदर्यरस.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हरिभाऊंचा ध्येयदर्शी वास्तववाद
७७
 

बायको, भाऊची आई, त्याची मामी, त्याची आजी या स्त्रिया अंध आहेत, अडाणी बोलभांड आहेत, दिमाखी, गर्विष्ठ आहेत. पण याचा अर्थ असा की सर्व प्रकारचे स्त्री-स्वभाव हरिभाऊंनी रंगविले आहेत. पक्षीय दृष्टिकोनातून काही लिहिले नाही.

 वास्तववाद हा बहुधा रूढिभंजन, मूर्तिभंजन यासाठीच अवतरलेला असतो. युरोपात औद्योगिक क्रान्तीनंतर विज्ञानाची अपरिमित वाढ झाली. आणि त्यामुळे समाजातील विचारवंत बुद्धिप्रामाण्यवादी बनले. त्या बुद्धिवादांतून वास्तववादाचा जन्म झालेला आहे. शब्दप्रामाण्यवादी लोक रूढ धर्मसंस्थांना, श्रुतीस्मृतीप्रणीत आचार-विचारांना अवमानू शकत नाहीत. त्यांच्या मनाला ते सामर्थ्यच नसते. हे सामर्थ्य विज्ञानाने मानवाला दिलेले आहे. पाश्चात्त्य विद्येच्या प्रसारामुळे दीर्घ कालानंतर ही विज्ञानप्रणीत, बुद्धिवादी दृष्टी भारतीयांना प्राप्त झाली. आणि त्यामुळेच येथले लेखक वास्तवादी होऊ शकले. या लेखकांचे हरिभाऊ हे अग्रणी होत. जुन्या रूढी, जुना धर्म, जुने आचार-विचार यांच्यावर त्यांच्या कादंबऱ्यांत सतत टीकास्त्र चालविलेले दिसते. हिंदू धर्माला त्या काळी अत्यंत अमंगळ रूप आले होते. कमालीची अवकळा आली होती. लोकहितवादी, रानडे, विष्णुशास्त्री, आगरकर यांनी त्याचे हे अमंगळ रूप आपल्या निबंधांतून स्पष्टपणे दाखवले होते. हरिभाऊंनी तेच रूप ललितसाहित्याच्या माध्यमांतून समाजाला दाखविले. जुन्या धर्माचे अभिमानी कर्मकांड, व्रतवैकल्ये, टिळाटोपी, गंधभस्म, ब्राह्मणभोजने यालाच धर्म मानीत. नीती, सदाचरण, स्वार्थत्याग, जनसेवा, माणुसकी यांची त्यांना मुळीच पर्वा नसे. या धर्माचे हे रूप शंकरमामंजी, काकासाहेब, सदूनाना, भिकंभट, गोपाळशास्त्री इत्यादी गृहस्थ व भटभिक्षुक या व्यक्तींच्या द्वारे उभे करून गणपतराव, भावानंद, शिवरामपंत, रघुनाथराव इत्यादी सुशिक्षितांच्या व्यक्तिरेखांकरवी हरिभाऊंनी त्यांचा निषेष केला आहे. मानवतेचे सुखसंवर्धन हा आगरकरप्रणीत धर्म या सर्व नव्या पिढीच्या लोकांना वेद्य आहे. 'माझे घर म्हणजे निराश्रितांना आश्रय, भुकेल्यास अन्न, तान्हेल्यास पाणी, वस्त्रहीनास वस्त्र, विद्यार्थ्यास विद्या इत्यादी मिळण्याचे ठिकाण असावे,' असे भावानंदाचे स्वप्न आहे. या तरुणांच्या मते हा खरा