पान:सौंदर्यरस.pdf/८१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
७६
सौंदर्यरस
 

हे त्यांना मुळीच पसंत पडले नाही. 'तू परत सासरी जा' असेच त्यांनी प्रथम तिला सांगितले. यामुळे भाऊ फारच संतापला व म्हणाला, 'काय, त्या बदफैली अमंगळ थेरड्याच्या घरी त्यांच्या त्या अवदसांची सेवा करायला जायला तिला सांगता ? मामा, मी भिक्षा मागेन पण ताईला परत पाठविणार नाही.' या वेळी ती दोघे बहीणभावंडे मामांच्यावर अवलंबून होती. या अपमानामुळे ते आता पैसे धाडण्याचे बंद करतील हे उघड होते. तेव्हा शिक्षण सोडून नोकरी धरण्याचे भाऊंनी ठरविलेही होते. पण मामांनी तसे मनातही आणले नाही. 'मी तुम्हाला कधीही अंतर देणार नाही.' असेच आश्वासन त्यांनी त्या भावंडांना दिले. आणि ताईला पूर्वीच्या मायेनेच त्यांनी घरी नेले. 'नवऱ्यापासून बायकोनं दूर राहणं बरं नाही, असं वाटतं, म्हणून तुला तसं बोललो.' असे ते ताईला म्हणाले. म्हणजे मत सनातनी असूनही नवऱ्याचे घर सोडून आलेल्या भाचीला त्यांनी प्रेमाने संभाळले. ताईच्यां मामींना आजीला हे मुळीच पसंत नव्हते. त्यांनी तिला घरी फार त्रास दिला. तिला त्या फार बोलत. तो सर्व त्रास सोसून मामांनी तिला अंतर दिले नाही. कारण त्यांनी माणुसकीला अंतर दिला नव्हता. आणि हरिभाऊंना तोच सर्वात श्रेष्ठ धर्मं वाटत होता. सनातन धर्माला अमंगळ रूप आले होते ते त्यातील माणुसकी गेल्यामुळेच, सुधारणा हवी होती ती माणुसकीच्या प्रस्थापनेसाठीच. त्यामुळे ती जेथे दिसेल तेथे वास्तववादी हरिभाऊ तिचा आदर करतात यात नवल ते काय ?

 स्त्री-शिक्षणाचे हरिभाऊ कट्टे पुरस्कर्ते शिक्षणामुळे मनाचा विकास होतो असा त्यांचा पक्का विश्वास. पण म्हणून जुन्या काळच्या अशिक्षित स्त्रियांची त्यांनी एकजात विद्रूप चित्रे काढली नाहीत. अगदी आदर्श व वंदनीय अशा किती तरी अशिक्षित स्त्रियांच्या व्यक्तिरेखा त्यांच्या कादंबऱ्यांतून दिसतात. यमूची आई व आजी (पण लक्षात कोण घेतो), विनायकाची बायको सरस्वती व आई जानकीबाई (मधली स्थिती), यशवंताची आई (यशवंतराव खरे), या स्त्रियांची चित्रे मोठी उदार लेखणीने काढलेली आहेत गणपतराव, नानासाहेब हे सुधारक पण त्यांच्या स्त्रिया बव्हंशी अशिक्षितच होत्या. तरी हेकट, दुराग्रही अशा त्या नव्हत्या. यमूची सावत्र आई, तिच्या बनुवन्सं, तिची भावजय, सदूनानाची