पान:सौंदर्यरस.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हरिभाऊंचा ध्येयदर्शी वास्तववाद
७५
 

डॉ. केतकरांनी केलेला आहे. सुधारकांविषयी त्यांचे मत वाईट होते. त्यामुळे 'गोंडवनातील प्रियंवदा', 'ब्राह्मणकन्या' या कादंबऱ्यांत त्यांनी सर्व सुधारक हे एकजात पाजी, हरामखोर, फाशी देण्याजोगे, जोड्याने मारण्याजोगे अशी अत्यंत बेजबाबदार विधाने ज्याच्या त्याच्या तोंडी घालून दिली आहेत. वास्तवसृष्टी जाणण्याचे ज्ञानकोशकारांना सामर्थ्यच दुर्दैवाने नव्हते. सुदैवाने हरिभाऊंना असली एकांगी पक्षदृष्टी नव्हती. 'भयंकर दिव्यं' मधील दादासाहेब हे अगदी कट्टर सनातनी आणि सनातनधर्माला अत्यंत अमंगळ व गलिच्छ रूप आले आहे असाच हरिभाऊंचा प्रतिपाद्य विषय. पंण दादासाहेबांची व्यक्तिरेखा अगदी उमद्या रंगात त्यांनी रंगविली आहे. स्वार्थी नीतिहीन असे वर्तन त्यांनी केव्हाही केलेले नाही. उलट त्यांचा मुलगा पद्माकर हा सुधारक पक्षाचा व स्वतः कर्ता सुधारक असूनही तो उतावळा हलक्या कानाचा, सारासारविवेकशून्य असा त्यांनी दाखविला आहे. कोणताही पक्ष घेतला तरी त्यात सर्वच माणसे सर्वगुणसंपन्न किंवा अगदी गुणहीन असतात हे खरे नाही हे हरिभाऊंनी जाणले होते.

 'यशवंतराव खरे' या कादंबरीतील श्रीधरपंत व यशवंतराव या व्यक्तिरेखा पहा. सुधारक पक्षाची हेटाळणी करणारे, टवाळीतच आनंद मानणारे, टीका करताना जास्तीत जास्त कुत्सितपणे लिहिणारे. बोलणारे- असे हे गुरु-शिष्य होते आधी राजकीय सुधारणा झाली पाहिजे, सामाजिक सुधारणेत काही अर्थ नाही, स्त्रीशिक्षण, पुनर्विवाह हे केवळ थेर आहेत, स्वातंत्र्याचा व या सुधारणांचा काही संबंध नाही, असे म्हणून ते दोघे त्या सुधारणांची भरमसाठ निंदा करीत. हरिभाऊंना हे मुळीच मान्य नव्हते तरी श्रीधरपंतांची विद्वत्ता, त्यांचा व्यासंग त्यांचा दयाळू स्वभाव, यशवंतासारख्या गरीब विद्यार्थ्याविषयी त्यांना वाटणारी आस्था हे त्यांचे गुण हरिभाऊंनी यथार्थपणे वर्णिले आहेत. त्याचप्रमाणे यशवंताचा स्वाभिमान, त्याची अभ्यासू वृत्ती, त्याची देशभक्ती, मॅझिनी, रिएंझी यांच्याविषयीचा त्यांचा आदरभाव या गुणांचा हरिभाऊंनी अपलाप केला नाही 'मी' कादंबरीतील भाऊचे मामा याचे चित्र या दृष्टीने उद्बोधक आहे. हा गृहस्थ अगदी सनातन मताचा. पतीचे घर सोडून 'ताई' ही त्यांची भाची माहेरी भाऊकडे आली