पान:सौंदर्यरस.pdf/७९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
७४
सौंदर्यरस
 

पण मागल्या काळातही असे घडत नसे. रामायण-महाभारतातील रावण, इंद्रजित, दुर्योधन, दुःशासन, कर्ण हे दुर्जन शिक्षेला भिऊन देवाच्या किंवा गुरूंच्या चरणी कधीच लागले नाहीत. शेवटपर्यंत त्यांनी आपला स्वाभिमान, आपली अहंता, आपला ताठरपणा कधी सोडला नाही. मरणाला ते भ्याले नाहीत. मृत्युसमयीसुद्धा दुर्योधन, दुःशासन यांनी श्रीकृष्ण व पांडव यांच्यावर शिव्याशापांचा भडिमारच केला. आणि आम्हीच खरे यशस्वी, आम्हीच खरे क्षात्रधर्मी असा अहंकार, मृत्यू समोर उभा असताही मिरविला. पण गुरू व देव यांना विरोधी असलेल्या पक्षात असे तेज दर्शविणे पुढल्या काळात लेखकांनी निषिद्ध मानले व अवास्तव चित्रे रंगविली.

 हरिभाऊंनी, मागे एके ठिकाणी सांगितल्याप्रमाणे, रामायण- महाभारताचा आणि इंग्रजी महाकवींचा आदर्श समोर ठेविला होता. त्यामुळेच त्यांच्या व्यक्तिरेखा जिवंत झाल्या आहेत. ती स्वर्ग-नरकातील चित्रे न होता इहलोकीची चित्रे झाली आहेत.

 'उषःकाला'तील रंगराव अण्णांचे व्यक्तिचित्र या दृष्टीने पाहण्याजोगे आहे. स्वराज्य स्थापनेचा शिवाजीराजे यांचा जो प्रयत्न चालला होता, त्याला त्यांचा कडवा विरोध होता. विजापूरच्या बादशहाचे ते एकनिष्ठ सेवक होते. स्वामिनिष्ठेमुळे प्रत्यक्ष आपल्या पुत्राला नानासाहेबाला राजद्रोहाच्या आरोपावरून पकडून बादशहाच्या ताब्यात देण्यास ते उद्युक झाले होते. शिवबाराजांना ते अनन्वित शिव्या देत असत असे असूनही त्यांचे कर्तृत्व, त्यांची स्वामिनिष्ठा, त्यांचा करारीपणा यांचे हरिभाऊंनी यथार्थ वर्णन केले आहे. त्यांच्याबद्दल अनादर वाटेल, किळस येईल असे वर्णन कोठेच केले नाही. लेखकाचे जे मत, त्याच्या विरुद्ध पक्षातील सर्व लोक नीतिहीन, कर्तृत्वहीन, दुबळे, पराक्रमशून्य व तिरस्करणीय असतात हे हरिभाऊंना मान्यच नव्हते. त्यांच्या सामाजिक कादंबऱ्यांतही त्यांची हीच वृत्ती दिसून येते. ते सुधारक पक्षाचे होते हे उघड उघड दिसते. प्रौढविवाह, विधवाविवाह, स्त्रीशिक्षण, स्त्री-पुरुष समता यांचा त्यांनी पुरस्कार केला आहे. पण म्हणून सनातनी मताचे ते सर्व नीतिहीन, गलिच्छ, स्वार्थी, आपमतलबी, कर्तृत्वशून्य, लाचार, गुलामी वृत्तीचे असे त्यांनी मुळीच दाखविलेले नाही. तो पराक्रम