पान:सौंदर्यरस.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सौंदर्य रस
 

देव कृपा करीत नाही आणि अन्नान्नदशा असेल तेथे तो भरपूर संतती देतो. देवाची ही वक्रगती मानवाच्या मनात इतकी ठसून गेली आहे की, अत्यंत लहानसहान घटनांवरूनसुद्धा तो असाच अर्थ काढीत असतो. बससाठी आपण एका ठिकाणी उभे असावे, तर उलट दिशेने जाणाऱ्या चार गाड्या येऊन जातात, पण आपल्या बाजूची एकही येत नाही. तेव्हा माणूस मनात म्हणतो की, 'आम्ही इकडे उभे आहोत ना ! तेव्हा असे होणारच !'
 जीवन असे धरबंधहीन आहे, न्यायशून्य आहे, त्यात कसलीही व्यवस्था नाही, कार्यकारण नाही, रचना नाही, सुसंगती नाही, हे पाहून माणूस वैतागून गेलेला असतो. आणि त्यामुळे कोठे व्यवस्था, रचना, सुसंगती दिसली की त्याला आनंद होतो, समाधान वाटते. आणि या विसंगत जीवनात आपणही आपल्या अल्प कुवतीप्रमाणे काही रचना करावी, सुसंगती निर्मावी अशी त्याला आस वाटत असते. ती त्याच्या जिवाची आर्त असते, उत्कट इच्छा असते. मानवाच्या या इच्छेतूनच सर्व मानवी संस्कृतीचा आणि तीतूनच पुढे सर्व कलांचा जन्म झालेला आहे.
 मानवी संसारातल्या कोठल्याही वस्तूकडे आपण नजर टाकली तरी ती वस्तू म्हणजे मानवाने केलेली एक रचना आहे असे आपल्या ध्यानात येईल. कागद ही रचना आहे, कापड ही रचना आहे. लेखणी, आरसा, दिवा, भांडे, शेगडी, पाट, या सर्व मानवकृत रचना आहेत. यातली कोणतीही वस्तू मुळात निसर्गात अशी नव्हती. खुर्ची, टेबल, घड्याळ, नांगर, दोरखंड, माग, गाडी, मोटार, विमान या सर्व मानवाच्या कृती आहेत, नवनिर्मिती आहेत. दगडावर दगड रचून मानवाने स्वतःसाठी निवारा तयार केला त्या दिवशी संस्कृतीला प्रारंभ झाला. दगड किंवा हाडूक घासून त्याने हत्यार तयार केले व प्राण्यांना मारून तो अन्न मिळवू लागला तेव्हा तिचे एक पाऊल पुढे पडले. आणि आपली प्रत्येक गरज भागविताना हत्यार, गाडी, कपडा या वस्तूंची रचना करीत करीतच त्याने संस्कृती निर्माण केली. या त्याच्या रचना, त्याने निर्माण केलेले हे आकृतिबंध, अरूपाला त्याने दिलेले हे रूप जेव्हा जास्त सुंदर, जास्त मनोहर झाले, तेव्हा त्यालाच तो कला म्हणू लागला. चित्र, शिल्प, वास्तू, नृत्य, संगीत, काव्य, नाट्य या कलांकडे आपण पाहिले तर