पान:सौंदर्यरस.pdf/७८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
हरिभाऊंचा ध्येयदर्शी वास्तववाद
७३
 

झाल्यामुळे दुःख नष्ट झाले असे होत नाही. नव्या पिढीला नव्या विवंचना असतातच. गणपतरावांचा मुलगा चंद्रशेखर एम्. ए. झाला. पण आपण पुढच्या आयुष्यात काय करावे हे त्याला निश्चित करता येत नाही. तशात नास्तिक व जडवादी असूनही अखंडानंद या स्वामींच्या तो नादी लागला. त्यांचे त्यांच्या मनावर जबर वर्चस्व पडले. त्यामुळे आपला मुलगा संन्यासी होऊन घरातून जातो की काय ही एक नवीनच विवंचना त्याच्या आई- बापांना लागली. नानासाहेबांची मुलगी लीलावती हिच्या दुःखाचे असेच काही कारण आहे. आईवडील सुधारक, ती शिकलेली या कारणामुळे तिला आता कसलाही त्रास नाही. पण याहून निराळी अशी तिच्या दुःखाची कारणे आहेत. ती काय ते कादंबरी अपूर्ण राहिल्यामुळे आपल्याला समजत नाहीत. पण कोठल्याही अवस्थेत मनुष्य गेला तरी संसार सर्वस्वी सुखी किंवा दुःखी असा नसतो हे जे सत्य तेच येथे प्रतीत होत आहे असे म्हणण्याइतके या कादंबरीतले जीवनदर्शन वास्तव आहे यात शंकाच नाही.

 लेखकाने स्वपक्ष व विपक्ष यांचे यशापयश व सुखदुःख कसे रंगविले आहे यावरून त्यांच्या वास्तववादाची जशी परीक्षा होते तशीच त्याच्या स्वपक्षविपक्षीयांच्या स्वभावलेखनावरूनही होते. हरिभाऊ हे मराठीतले पहिले वास्तववादी लेखक. त्यामुळे त्यांना सर्वच कादंबरी तंत्राप्रमाणे याही बाबतीत नवी परंपरा निर्मावयाची होती. ती त्यांनी फार उत्तम रीतीने निर्माण केली आहे असे आपल्याला दिसून येईल. जुन्या काळच्या लेखनात स्वपक्षातले सर्व लोक सज्जन, सालस, सदाचरणी, कष्टाळू, हरिभक्त व पुण्यशील आणि विपक्षातील सर्व लोक दुष्ट, नीच, स्वार्थी, देवद्वेषी, पापी व घातक असे असत. महीपतीची संतचरित्रे, श्रीधराचे शिवलीलामृत, सरस्वती गंगाधराचे गुरुचरित्र इत्यादी ग्रंथांत सर्वत्र हेच दिसून येईल. यांच्यातील संघर्षाचा अंती निकाल कसा व्हावयाचा हेही ठरलेलेच असावयाचे. दुष्ट लोकांना परमेश्वराच्या व श्रीगुरूच्या कोपामुळे काही तरी कडक शिक्षा व्हावयाची आणि त्यामुळे पश्चात्तापदग्ध होऊन ते गुरूच्या चरणी लागावयाचे व मग त्यांचाही सज्जनांबरोबर उद्धार व्हावयाचा! खरोखर याइतके असत्य असे जगात काही नाही. सध्याच्या काळात तर असे घडत नाहीच.