पान:सौंदर्यरस.pdf/७६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
हरिभाऊंचा ध्येयदर्शी वास्तववाद
७१
 

सुधारणा करू इच्छिणाऱ्या तरुण स्त्रीपुरुषांना कोणत्या यमयातना भोगाव्या लागतात त्याचे त्यांनी यथार्थ वर्णन केले आहे.
 पण वास्तव म्हणजे केवळ दुःख, केवळ यातना, केवळ अपयश हेही खरे नाही. जगात दु:ख जास्त, सुख कमी खरे. हे अपयश फार वेळा, यश दुर्मिळ हेही खरे. पण एकजात अथपासून इतिपर्यंत हा संसार दुःखमय आहे, यश कोणाच्या वाट्याला येतच नाही, हे खरे नाही. तसे वर्णन हा वास्तवाद कधीच होणार नाही. तसे जीवन वर्णन करावे ही सध्याच्या काळात फार प्रवृत्ती आहे. जगात कोणी यशस्वी होतो, कोणाचा ध्येयवाद सिद्धीस जातो, कोणी अखेरपर्यंत पवित्र राहतो, निष्कलंक राहतो, हे सध्याच्या लेखकांना मान्यच नसावे असे दिसते. पण हाही वास्तववाद नाही. मागल्या भोळ्या लोकांनी स्वर्गाची चित्रे काढली तर हे नवे लोक एकजात नरकाची चित्रे काढीत आहेत. त्यामुळे तेही वास्तवापासून दूरच आहेत. पृथ्वीची चित्रे काढणे याचे नाव वास्तववाद होय. आणि हरिभाऊंना याची पूर्ण जाणीव असल्यामुळे त्यांनी पृथ्वीवरील जीवन हेच आपले लक्ष्य ठेविलेले आहे.
 'पण लक्षात कोण घेतो' यातील जीवन म्हणजे, काही अपवादात्मक हिरवळ सोडली तर, बहुतेक सहारा वाळवंटच आहे. पण 'मी' हे तितके नाही. तेथे थोडी हिरवळ जास्त दिसू लागते. भाऊ बी. ए. झाला. एल्एल्.बी. झाला. आाणि वकिलीत पोटापुरते मिळवून राहिल्या वेळात समाजसेवेचे काम करावे, ते करणे शक्य व्हावे, अशी बरी स्थिती त्याला प्राप्त झाली. त्याची बहीण ताई हिला दारुण यातना सोसाव्या लागल्या, पण वैधव्य आल्यावर तिची स्थिती अगदी यमुनेसारखी झाली नाही. घर तिच्या नावेच राहिले. थोडे पोटापुरतेही राहिले. शिवरामपंतांसारख्यांच्या आधाराने तिच्या शिक्षणाची सोय झाली. आणि विशेष म्हणजे या समाजात विधवेच्या मनोविकासाला अवसर मिळाला, स्त्रीच्या कर्तृत्वाला थोडा वाव मिळाला. जीवनात थोडी आशा आहे, केव्हा केव्हा यश मिळू शकते, केव्हा केव्हा यश आणि सुख दोन्ही मिळू शकतात, असा थोडासा भास 'मी' या कादंबरीवरून होतो.
 हा सुधारणेचा झगडा आहे. रणसंग्राम आहे. यात सनातन समाजाच्या विरुद्ध बंड करण्यास ठाकलेल्या तरुण स्त्री-पुरुषांच्या संसाराचा आरंभी जरी