पान:सौंदर्यरस.pdf/७५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
७०
सौंदर्यरस
 

वागते, इतक्या उघडपणे प्रणयचेष्टा करते की कित्येक घरांत आजही ते खपणार नाही. बिंबाच्या पुनर्विवाहाची कथा अशीच वास्तवापासून दूर आहे. एका मालगुजार घराण्यातील ही स्त्री, एक मुलगा झाल्यावर तिला वैधव्य आले. मग तिने हरिभय्या मोघे यांच्याशी पुनर्विवाह केला. पण त्या विवाहाला विरोध, त्यांची निंदा, वर्तमानपत्रांत त्यांच्यावर अत्यंत गलिच्छ आरोप, तो घडेल न घडेल याची चिंता, यांचे नाव नाही. डॉ. केतकरांना समाजपरिस्थितीची इतकी शून्य कल्पना असेल हे कोणाला खरे तरी वाटेल काय ? पण त्यांच्या सर्व कादंबऱ्या अगदी गंधर्वनगरीतल्या आहेत. 'ब्राह्मणकन्या' या कादंबरीत तर कल्पनारम्यतेची केतकरांनी कमाल केली आहे. कालिंदीही वेश्याकन्या होती. यामुळे आपल्याला कुलीन घराण्यात स्थळ मिळेल हे तिला शक्य वाटेना. म्हणून तिने केले काय ? तर बी. ए. च्या वर्गातली ही मुलगी एका वाण्याच्या घरी रखेली म्हणून राहिली ! पुढे त्याने तिला टाकली. तेव्हा तिला एक मूलही झाले होते. पण अशा स्थितीत पुढे लोकांकडून तिला कसलाही त्रास झाला नाही. तिला उत्तम नोकरी मिळाली. रामरावासारखा कुलीन घराण्यातला नवरा मिळाला, आणि पहिल्या मुलाला संभाळण्यासही तो तयार झाला. जुन्या काळात शंकर-पार्वती प्रसन्न होऊन आणखी काय देत होते ? अकुलीन संततीचा प्रश्न बिकट आहे असा या कादंबरीचा विषय. पण कालिंदीच्या कथेवरून तसा तो मुळीच नाही असे सिद्ध होते. डॉ. केतरांच्या कादंबऱ्यांत प्रौढविवाह, विधवाविवाह, अकुलीन संततीचा विवाह या समस्या म्हणजे समस्या नाहीतच. चंदनाचे सडे घालून, पारिजातकाची वृष्टी करून केतकरांनी सर्वांचे मार्ग सुखद करून टाकले आहेत. विनायकाची मूर्ती करण्याचा मानस असताना वानर रचल्याचे हे उत्तम उदाहरण आहे. राजकीय सुधारणेपेक्षा धार्मिक व सामाजिक सुधारणा- दसपटीने, शतपटीने कठीण असते, कारण स्वसमाजाचाच त्यांना विरोध असतो, हे प्रत्येक समाजाच्या इतिहासात पानोपानी, पावलोपावली, दिसतं असते. पण ज्ञानकोशकारांनी ज्ञान आणि साहित्य यांचे दोन निराळे कप्पेच आपल्या मनात करून टाकले असावे, असे दिसते. साहित्याशी समाजाच्या ज्ञानाचा त्यांनी संबंधच येऊ दिला नाही. असा संबंध आणून साहित्य लिहिणे याचेच नाव वास्तवाद ! हरिभाऊंनी ते केल्यामुळे धार्मिक व सामाजिक