पान:सौंदर्यरस.pdf/७४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
हरिभाऊंचा ध्येयदर्शी वास्तववाद
६९
 

ध्यानात आणून द्यावे, या मार्गाने गेलात तर अपयशाखेरीज, लोकनिंदेखेरीज दुसरे काही वाट्याला येणार नाही, हे त्यांना बजवावे हाच हेतू होता आणि सुधारकाच्या जीवनाचे असे सत्यदर्शन घडूनही तरुणांनी त्या मार्गाला जावे असा त्यांचा उपदेश होता. भावी सुखाच्या रम्य कल्पना करून, स्वप्नसृष्टीत दंग होऊन तरुणांनी या मार्गात पाऊल टाकावे असे त्यांना मुळीच वाटत नव्हते. महाकवी वाल्मीकींचा आदर्श त्यांनी डोळ्यासमोर ठेवला असावा असे वाटते. सीता ही त्रैलोक्यपावनी होती. रामचंद्राचे सर्व आयुष्य पितृभक्ती, प्रजानुरंजन यांत गेले. पण त्यांना लौकिक अर्थाने लवमात्र सुख मिळाले नाही. वनवास, वियोग, दुःख, लोकापवाद हेच त्यांच्या नशिबाला आले. त्यांचा संसार असा दुःखमय झाला असे चित्रण करण्यास महाकवी मुळीच कचरले नाहीत. ध्येयवादाच्या उपदेशाला स्वप्नभूमीतले जीवनदर्शन अवश्य आहे असे त्यांना कधीच वाटले नाही. उलट त्यासाठी कठोर वास्तवाचाच पाया अवश्य आहे असे त्यांचे मत होते. यमुना- रघुनाथांच्या जीवनाचे हरिभाऊंनी ह्याच धोरणाने चित्रण केले आहे.

 वास्तववाद ज्यांना पेलत नाही, ज्यांना त्याचे चित्रण करता येत नाही, अशा लेखकांच्या कादंबऱ्यांशी हरिभाऊंच्या कादंबऱ्यांची तुलना केली तर वास्तववादाचा खरा अर्थ सहज घ्यानात येईल. मराठीतील हरिभाऊंखेरीज बहुतेक सर्व लेखक असेच आहेत. वास्तववाद पेलण्याचे सामर्थ्य बहुतेकांना नाही. डॉ. केतकरांच्या कादंबऱ्या पाहा. 'गोंडवनातील प्रियंवदा' या कादंबरीतील घटना १८९६ च्या सुमाराच्या आहेत. त्या काळी प्रियंवदा लग्नापूर्वीच प्रौढ झाली होती. १७/१८ व्या वर्षी तिचे लग्न झाले. पण मुलगी इतकी मोठी वाढविली म्हणून तिच्या आईबापांना काही त्रास झाला असेल, सामाजिक बहिष्काराची भीती निर्माण झाली असेल, अत्यंत कटू, गलिच्छ निंदा सहन करावी लागली असेल, हे केतकरांच्या गावीही नाही. 'मी' मधील सुंदरीला तिच्या वडिलांनी अशीच वाढविली होती. त्यामुळे आपल्या घरातसुद्धा तिला येऊ देण्यास अनेक बायकांना भीती वाटत असे. पण केतकरांच्या कृपेने प्रियंवदेला किंवा तिच्या आईबापांना तसला काहीच त्रास झाला नाही. त्या काळात ही मुलगी सासरी नवऱ्याशी इतक्या धिटाईनं