पान:सौंदर्यरस.pdf/७३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
६८
सौंदर्यरस
 

सत्त्व कधी सोडले नाही. पण त्या पुण्यामुळे त्यांना अंती सुख मिळाले असे दाखविण्याचा मोह हरिभाऊंना कधीच झाला नाही. सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे, हे जे संसाराचे खरे स्वरूप तेच हरिभाऊंनी दाखविले आहे. यमुनेचा सासरी अंति छळ झाला. तिची आई गेल्यावर माहेरचे सुखही संपले. पतीबरोबर ती मुंबईस राहिली तेवढेच काय ते सुखाचे दिवस. पण पुढील भयानक दुःखाची तीव्रता शतपटीने वाढविण्यासाठीच जणू काय ते सुख तिला मिळाले असे दिसते. दोन-तीन वर्षांतच रघुनाथरावांना मृत्यू आला आणि यमुना दुःखाच्या गर्तेत फेकली गेली ती कायमचीच. जबरीने तिचे केशवपन करण्यात आले व सर्व दृष्टींनी तो पराधीन झाल्यामुळे जिवंत नरकवास तिच्या कपाळी आला. तिचा भाऊ गणपती हा मोठा सालस व सुविचारी होता. पण त्यालाही बिचाऱ्याला पैशाचे, बायकोच्या सहकार्याचे वा इतर कसलेच सुख मिळाले नाही. जी जी म्हणून सालस, सद्गुणी, सदाचारी व्यक्ती या कादंबरीत आहे ती संपूर्ण अपयशी झालेली आहे, तिचा सर्वस्वी निःपात झाला आहे. असेच दृश्य या कादंबरीत दिसते. आणि यशस्वी व सुखी कोण झाले ? तर शंकरमामंजीसारखे नरकासुर ! इतका नीच, अधम, आसुरी वृत्तीचा माणूस. पण त्याच्या वाट्याला दुःख असे फारसे आलेच नाही !

 हरिभाऊ हे सुधारक होते. स्त्रीशिक्षण, प्रौढविवाह, स्त्रीपुरुष समता, विधवाविवाह, रूढिभंजन यांचे ते कट्टे पुरस्कर्ते होते तेव्हा या पक्षाच्या लोकांचा जय होतो, या सुधारणांनी त्यांना सुख मिळते, चांगल्या नोकऱ्या मिळतात, समृद्धी लाभते असे दाखविण्याचा मोह, ते अपक्व, अप्रौढ असते, तर त्यांना निश्चित झाला असता. पण महाराष्ट्राच्या सुदैवाने तसे ते नव्हते. ते खरे वास्तववादी होते. जग त्यांनी खरे जाणले होते. आणि सुधारणावादी लोकांच्या जीवनाचा कादंबरीत गोड शेवट केला म्हणजे त्यामुळे सुधारणावादाची प्रगती होईल, असे त्यांना मुळीच वाटत नव्हते. लोकशिक्षण हाच त्यांच्या लेखनाचा निश्चित हेतू होता. पण भ्रामक संसारचित्रे निर्माण करून, सत्यापलाप करून लोकांना आगरकरपंथाकडे वळवावे हे त्यांना मुळीच मान्य नव्हते. उलट लोकांना सुधारणेच्या मार्गातील भयंकर आपत्ती दाखवाव्या, सुधारकाला कोणत्या अग्निदिव्यातून जावे लागते हे त्यांच्या