पान:सौंदर्यरस.pdf/७२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
हरिभाऊंचा ध्येयदर्शी वास्तववाद
६७
 

की त्या नष्ट केल्या पाहिजेत असे भावनावश न होता सांगणारा तो खरा वास्तववादी होय. हरिभाऊंचा वास्तववाद काहीसा या स्वरूपाचा आहे.

 प्रारंभी त्यांनी 'मधली स्थिती' ही कादंबरी लिहिली त्या वेळी त्यांचे मन काहीसे अपक्व होते. त्यांची कलाही परिणत झाली नव्हती. त्यामुळे ती कादंबरी काहीशी पुराणरूपाची झाली आहे. तीत सज्जनांना अंती सुख लाभते व दुर्जनांना शिक्षा होते असे दाखविण्याचेच धोरण आहे. विनायकराव हा गोविंदराव वकिलांच्या नादाने व्यसनी होतो, पैशाची वाटेल तशी उधळपट्टी करतो, आईला दुरुत्तरे करतो, व पत्नीचा- सरस्वतीचा अनन्वित छळ करतो पण शेवटी त्याचे डोळे उघडतात, तो निवळतो व आई व पत्नी यांच्या पाया पडून त्यांची क्षमा मागून सर्वस्वी त्यांच्या आज्ञेत वागू लागतो, अशी ही कथा आहे. शिवराम व दुर्गी यांच्या संसाराचें रूपही असेच वर्णिले आहे. गोविंदराव व इतर दुष्ट स्त्री-पुरुष हे शेवटी आपल्या पापकर्मामुळे तुरुंगात जातात. धर्मामुळे सुख मिळते व अधर्मामुळे नाश होतो, असे चित्रण करण्याचा कादंबरीकाराचा हेतू या कादंबरीत स्पष्ट दिसून येतो. तिमाजी नाईक यांनी अनीतीने अमाप पैसा मिळविला होता. त्यांचे चिरंजीव विनायकराव यांच्या हाती तो येताच त्यांनी कमालीची उधळपट्टी करण्यास प्रारंभ केला. हे सांगून हरिभाऊ म्हणतात, 'अन्यायाने मिळालेल्या पैशाचे हेच होणार.' अशी सिद्धान्तवचने, या कादंबरीत ठायी ठायी सापडतात. विष्णू आणि गणू या अभ्यासू व उनाड अशा दोन मुलांची चित्रे काढून हरिभाऊ म्हणतात, 'वाचकहो, तुमच्यापुढे या दोन तसबिरी ठेविल्या आहेत. त्यातील तुम्हाला कोणती आवडते ? विष्णूचीच ना ? मग घ्या तर ती विष्णूची तसबीर' हा वास्तववादही नाही आणि ही कलाही नाही. या कादंबरीचा हरिभाऊंच्या 'विदग्धवाङ्मया'त कधीच समावेश होणार नाही. कारण त्या वाङ्मयाची रचना कलापूर्ण असली पाहिजे व त्यातील बोध अवगुंठित असला पाहिजे असे हरिभाऊंनीच सांगितले आहे.
 'पण लक्षात कोण घेतो', 'मी', 'यशवंतराव खरे' या कादंबऱ्यांत हरिभाऊंच्या वास्तववादाचे खरे वैभव दृष्टीस पडते. यमुना, दुर्गी, भाऊ, ताई, यशवंत यांच्यावर अनेक आपत्ती आल्या. त्या आपत्तीत त्यांनी आपले