पान:सौंदर्यरस.pdf/७१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
६६
सौंदर्यरस
 

समजूत अशी असते की सदाचरणाला अंती उत्तम फळ मिळते, परमेश्वर सज्जनांना न्याय देतो. दुर्जनांना शासन करतो, पापाचे परिणाम वाईट होतात, पापी लोक नरकाला जातात, पुण्याचरणी लोक स्वर्गाला जातात असे दाखविल्याखेरीज सदाचरणाकडे, नीतिमत्तेकडे, पुण्याकडे लोकांची प्रवृत्ती होणार नाही. म्हणून हे लेखक, आपल्या सत्प्रवृत्त नायक-नायिकांवर प्रारंभी अनंत संकटे कोसळली, त्यांना नाना यातना भोगाव्या लागल्या, असह्य दुःखे सोसावी लागली तरी त्यांना त्यांच्या नीतिनिष्ठेमुळे अंती सुखाचे दिवस आले, शेवट गोड झाला, असेच दाखवितात. नाही तर लोकांना सत्य, नीती, न्याय, पुण्य, याविषयी उत्साह वाटणार नाही, असे या लेखकांना, वाटते. पुराणातील सर्व कथा, गुरुचरित्र, शिवलीलामृत यांतील कथा त्या त्या लेखकांनी या हेतूनेच लिहिलेल्या आहेत.

 पण काही विचारवंतांना हा दृष्टिकोन मान्य नाही. जगाचे सत्य-स्वरूप आहे तसेच, कोणत्याही इतर गोष्टींचा विचार न करता, चित्रिले पाहिजे असे त्याचे मत आहे. सत्य हे अनेक वेळा रूढ धर्म, नीती, पावित्र्य यांच्याविषयीच्या कल्पनांना मारक असते. ईश्वरावरील श्रद्धेला ते हादरून टाकते. पातिव्रत्य विवाहसंस्था, राजसंस्था, चातुर्वर्ण्यासारख्या समाजसंस्था, यांच्या प्रतिष्ठेला ते विघातक असते. पण असे असले तरी सत्याचा अपलाप करू नये, भावनावश होऊन मूळ वस्तूला अद्भुत कळा चढवू नये, कशाची भीड पूर्ववत धरू नये आणि जगाचे यथार्थ दर्शन घडविण्यास कचरू नये, असे त्यांचे मत आहे. व्यास, वाल्मीकी, हे महाकवी या मताचे आहेत हे सर्वमान्य आहे. या महापुरुषांना धर्म-नीती यांची पर्वा नाही, असे नाही. पण सत्यदर्शनानेच त्यांची खरी प्रतिष्ठा राहील, या कसोटीला टिकतील तीच खरी धर्मतत्त्वे, असे त्यांना वाटते. वास्तववाद यालाच म्हणतात. बनार्ड शॉ याने म्हटले आहे की, मनुष्य आपल्या प्रगतीसाठी धर्म, विवाह, कुटुंब, इत्यादी संस्था निर्माण करतो. कालांतराने त्या परमेश्वरकृत आहेत असा भ्रम निर्माण होतो. असल्या संस्थांची चिकित्सा करून त्यांचे सत्य स्वरूप जगाला दाखविणारा, त्या दैवकृत नाहीत, नैसर्गिक नाहीत, त्यांची उपयुक्तता संपली