पान:सौंदर्यरस.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हरिभाऊंचा ध्येयदर्शी वास्तववाद
६५
 

टाकण्याचे सामर्थ्य आहे, हे त्यांनी दाखवून दिले. एका सामान्य कारकुनाची मुलगी यमुना, दळणकांडण करून पोट भरणाऱ्या बाईचा मुलगा यशवंता नवऱ्याने टाकून दिलेल्या बाईचा मुलगा भाऊ, त्याचीच बहीण ताई, शिवरामपंतासारखे शिक्षक, श्रीधरपंतासारखे लेखक, बळवंतरावांच्या सारखे सुधारक यांच्या नित्याच्या जीवनातले हर्षामर्षाचे प्रसंग वाचण्याची गोडी हरिभाऊंनी समाजाला लावली यांत त्यांच्या प्रतिभेचे असामान्यत्व आहे. आपल्यासारख्या जनांच्या सुखदुःखाची वर्णने ऐकावी, वाचावी त्यात मन रमून जावे ही जी अभिरुची हरिभाऊंनी समाजात निर्माण केली तीच वास्तवाची अभिरुची होय. या जीवनात मेलेली माणसे जिवंत होत नाहीत, कोरडी तळी अचानकपणे पाण्याने भरून येत नाहीत, नद्या दुभंगत नाहीत, मांसाची फुले होत नाहीत, देवळांची तोंडे फिरत नाहीत, एका लहानशा तपेलीतला भात हजार माणसांना पुरत नाही, आंधळ्याला दृष्टी येत नाही, गुरुकृपेने रोग बरे होत नाहीत. असले काहीही घडत नाही. हे नित्याचे मागल्या लोकांना रूक्ष वाटणारे, रसशून्य वास्तव जीवन आहे. येथे पैशाची चिंता आहे, रोगराई आहे, सामान्य रूपाच्या स्त्रिया आहेत, अपयशी नायक आहेत, असे हे वास्तवजीवन आहे. पण यातही शृंगार, वीर, करुण, हास्य इत्यादी जे नवरस त्यांची मंदाकिनी पुराणकथा इतक्याच रम्य रूपात वाहत असते हे दाखवून देऊन तिच्यामध्ये अवगाहन करण्यातही तसाच अनिर्वचनीय आनंद असतो हे महाराष्ट्राला हरिभाऊंनी शिकविले. त्यांचा वास्तववाद तो हाच होय.

 नाना प्रकारच्या विचित्र, असंभाव्य, अद्भुत घटना व प्रसंग निर्मून रोमांचकारी कथानके रचण्यामध्ये वाचकांची करमणूक करणे, हा एक मोठा हेतू असतो. मुक्तामाला, मंजुघोषा या कादंबऱ्यांचे लेखक अरबी कथा, ठकसेन कथा, चांदोबातील कथा यांचे लेखक याच हेतूने लिहीत असतात. पण केवळ मनोरंजन हा हेतू नसूनही श्रेष्ठ दर्जाचे लेखक, कवी, ग्रंथकारही अद्भुताचा आश्रय करतात तेव्हा त्यांचा हेतू निराळा असतो. त्यांना समाजाला नीतिपाठ शिकवावयाचे असतात. सत्य, अहिंसा, परोपकार, गुरुभक्ती, श्रद्धा, सदाचरण यांचे धडे द्यावयाचे असतात. आणि त्यांची
 सौं. ५