पान:सौंदर्यरस.pdf/६९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
६४
सौंदर्यरस
 

अशी एकही कथा त्याने सांगितलेली नाही. जुन्या मराठी वाङ्मयात स्वतंत्रपणे रचलेल्या कथा नाहीतच. जी आख्यानकाव्ये आहेत त्यांत रामायण महाभारत, भागवत व इतर पुराणे यांतल्याच कथा वर्णिलेल्या आहेत. आणि त्यात मूळचे अद्भुत प्रसंग वर्णून शिवाय मराठी कवींनी स्वतःच्या कल्पनेने आणखी तसल्या प्रसंगांची भरही घातलेली आहे. अव्वल इंग्रजी काळात मराठीत काही स्वतंत्र रचना झाली. पण तिचा थाटही पुराणासारखाच आहे. मंजुघोषा, मुक्तामाला, मित्रचंद्र, विश्वासराव इत्यादी कादंबऱ्या या बहुधा राजेरजवाडे यांच्याच कथा आहेत. त्याच्या जोडीला श्रीमंत धनिक सावकार, जहागिरदार किंवा सत्यनारायण कथेतल्यासारखे वणिक्पुत्र हे फार तर येतात. आणि त्यांच्या जीवनातल्या चमत्कृती व अद्भुत घटना याच सर्वत्र वर्ण्यविषय झालेल्या आहेत.

 याचा अर्थ असा की, त्या काळात जनतेला चमत्कृतीची, अद्भुताचीच प्रामुख्याने आवड होती. सामान्य लोकांच्या सामान्य जीवनात वर्णन करून सांगण्याजोगे ते काय असणार, त्यात वाचणाराला, ऐकणाराला गोडी कशी वाटणार, काव्याचा आत्मा जो रस त्याची निष्पत्ती सामान्य प्रसंगांतून करणे कसे शक्य आहे, असेच बहुधा सर्व लोकांना व लेखकांचा त्या काळी वाटत असे. सावकार, जहागिरदार, राजे यांचे जीवन आणि तेही राजकन्येला पळविणे, विष घालणे, नायकाचा खून करणे, त्याला नाहीसा करणे, गुप्त कारस्थाने करून राजाला पदच्युत करणे व शेवटी देवांच्या साधूंच्या प्रसादाने पुन्हा सर्वाला गोड कलाटणी देणे अशा घटनांनी भरलेले हेच लोकांना प्रिय होते. आणि त्यामुळे तशाच प्रकारचे साहित्य हरिभाऊंच्या आधी बव्हंशी निर्माण होत होते.

 हरिभाऊंचे मुख्य कार्य हे की, सामान्य जनांच्या सामान्य जीवनात, त्यांच्या नित्याच्या जीवन रहाटीतही श्रवणीय असे पुष्कळ आहे; त्यांच्या जीवनातल्या नित्याच्या, चमत्कृतिहीन, वास्तव प्रसंगांतूनही उत्तम रसनिष्पत्ती होऊ शकते. त्यांच्या कथाही देवदेवता, राजेमहाराजे, सावकार, जहागिरदार यांच्या कथांइतक्याच आकर्षक होऊ शकतात, त्यांच्या जीवनातल्या घटनांतही ठकसेन राजपुत्रांच्या कथांइतकेच वाचकांना गुंग करून