पान:सौंदर्यरस.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे






सौंदर्यरस


 या जगातील मानवांपैकी बहुसंख्य मानव नेहमी दुःखी असतात, कष्टी असतात, वैतागलेले असतात. दिवसातून चार वेळा तरी ते कपाळाला हात लावतात. याचे कारण हे की, त्यांच्या आशा-अपेक्षा यांचा नित्य भंग होत असतो आणि त्याचे दुःख अनुभवताना त्यांच्या असे ध्यानात येत असते की जगात न्याय नाही, येथल्या घटनांना कसलाच धरबंध नाही 'सुख पहाता जवापाडे, दु:ख पर्वताएवढे,' हे तर विपरीत आहेच. पण त्यापेक्षाही जास्त विपरीत हे की, या सुखदुःखाला काही नियम नाही. माणसाचे कर्तृत्व, त्याचा प्रयत्न, त्याचे पाप-पुण्य व त्याला मिळणारे फळ यात कसलाच कार्यकारण भाव लोकांना दिसून येत नाही. संतसज्जनांना अनेक वेळा कष्ट, यातना, हालअपेष्टा सोसाव्या लागतात. आणि दुष्ट, पापी लोक सुखात लोळत असतात. श्रीमंतांच्या घरी अन्न विपुल असते, पण त्यांना खाण्याची वासनाच नसते. आणि गरीबांच्या पोटात आग पडलेली असूनही त्यांना अन्न मिळत नाही. दात आहेत तेथे चणे नसतात व चणे आहेत तेथे दात नसतात. जीवन असे सर्व बेबंद असंबद्ध आहे, त्यात सुसंगती अशी कोठे दिसतंच नाही. एके ठिकाणी अतिवृष्टीने पिकासकट शेतातली मातीही वाहून जाते, लोक बेघर होतात, पिढ्यान् पिढ्यांची कमाई पहाता पहाता नष्ट होते. तर दुसरीकडे पिण्यापुरतेसुद्धा पाणी मिळू नये इतकी अनावृष्टी! हा परमेश्वराच्या घरचा कोठला न्याय? श्रीमंतांच्या घरी मुलेबाळे हवी असतात. त्यांच्यावर